Mohata Devi : पाथर्डी : तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान श्री मोहटादेवी (Mohata Devi) गड पायथा परिसरात शुक्रवारी (ता.१२) अतिक्रमण (Encroachment) विरोधी मोठी कारवाई करण्यात आली. गडाच्या पायथ्याशी असणारी तब्बल ४८ दुकाने तसेच मोहटा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गडाजवळील ४ दुकाने अशी एकूण ५२ दुकाने सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून उभारण्यात आली होती. या अतिक्रमणांमुळे भाविकांच्या व प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याने पोलीस (Police) व प्रशासनाने संयुक्त कारवाई करत दुकानदारांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
नक्की वाचा: नगर-मनमाड रस्त्यावर पुन्हा अपघात; नागरिकांसह माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंचे रास्ता रोको आंदोलन
दुकानदारांना देण्यात आली सक्त ताकीद
या कारवाईत पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर, पोलीस कर्मचारी, जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच पंचायत समिती व महसूल विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते. या पथकाने सर्व दुकाने मोजणी करून, रस्त्याच्या मध्यापासून ६ मीटर अंतर सार्वजनिक रस्ता खुला ठेवणे बंधनकारक असल्याचे दुकानदारांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी राहुल कांबळे व पंचायत समिती बांधकाम विभागाचे अभियंता अर्जुन पठाडे, सुभाष केदार यांच्या उपस्थितीत दुकाने मोजण्यात आली. त्यानंतर रस्त्यावर झालेले अतिक्रमण दर्शविणाऱ्या खुणा करून दिल्या.
अवश्य वाचा: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका ताकदीने लढवणार: खासदार लंके
कठोर कारवाईचा इशारा (Mohata devi)
अतिक्रमण हटविण्याचे आदेश देतानाच दुकानदारांविरुद्ध पंचनामे करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुकानदारांनी तात्काळ अतिक्रमण काढून सार्वजनिक रस्ता खुला न केल्यास येत्या १६ सप्टेंबर रोजी पुन्हा कठोर कारवाई करावी लागेल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
या कारवाईसंदर्भात पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी सांगितले की, शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे रस्ते मोकळे ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व सार्वजनिक वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. मोहटादेवी गड परिसरात यापूर्वी अनेक वेळा अतिक्रमणावर कारवाई झाली होती, मात्र पहिल्यांदाच गुन्हे दाखल करण्याचे निर्णायक पाऊल उचलण्यात आले आहे. त्यामुळे आता अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, भविष्यात कुणीही रस्त्यावर अतिक्रमण करण्याचे धाडस करणार नाही, असा विश्वास व्यक्त होत आहे.
प्रशासनाकडून येत्या १५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीपूर्वी सर्व अतिक्रमणे हटविण्याचे निर्देश दिले गेले आहेत. पंचायत समिती व सार्वजनिक बांधकाम विभागाने दुकानदारांवर सातत्याने पाठपुरावा करून अतिक्रमण काढून घेतले पाहिजे, असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
शारदीय नवरात्र महोत्सव अगदी जवळ आला असताना प्रशासनाने केलेल्या या कठोर कारवाईचे भाविक व ग्रामस्थांकडून स्वागत होत असून, भविष्यात गड पायथा परिसर सुटसुटीत व सुरक्षित राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.