Mohatadevi : पाथर्डी : मोहटादेवी (Mohatadevi) माता की जय… या जयघोषात गुरुवारी (ता.३) मोहटादेवी भक्तांच्या साक्षीने मोहटादेवी गडावर पारंपरिक पद्धतीने घटस्थापना (Ghatasthapana) देवस्थान समितीचे अध्यक्ष निरंजन नाईकवाडे यांच्या हस्ते करण्यात आली. सकाळी मोहटे गावातून देवीचा सोन्याचा मुखवटा वाजतगाजत सकाळी अकरा वाजता देवी गडावर आणण्यात आला. गावात महाआरती, दर्शन सोहळा आयोजित केला गेला. गावातील लोकांच्या दर्शनासाठी देवीचा सोन्याचा तांदळा (मुखवटा) ठेवण्यात आला. आजपासून मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्र (Shardiya Navratri) उत्सवाची सुरुवात झाली आहे.
अवश्य वाचा : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…
भक्तांसाठी देवस्थानकडून सर्व सोया सुविधा उपलब्ध
देवी मंदिर गाभाऱ्यात मुख्य धार्मिक विधी देवस्थानच्या पुजाऱ्यांच्या मंत्र उच्चारात पार पडला. यावेळी दिवाणी न्यायाधीश तथा विश्वस्त मयूर पवार, अँड. कल्याण बडे, अँड. विक्रम वाडेकर, डॉ.श्रीधर देशमुख, शशिकांत दहिफळे, बाळासाहेब दहिफळे, विठ्ठल कुटे, अक्षय गोसावी, डॉ. ज्योती देशमुख, विद्या पवार, संगीता बडे, पूजा वाडेकर, लता दहिफळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे उपस्थित होते. घटस्थापनेच्या दिवशी देवीच्या स्वयंभू मूर्तीवरती सोन्याचा मुकुट (तांदळा ), देवीला नवीन साडी, सोन्याचा टोप, सोन्याचे अलंकार, देवीच्या नाकात नथ विविध प्रकारचे सोन्याचे विभूषण देवीला परिधान केल्याने देवीचे वेगळे रूप नवरात्रीमध्ये भक्तांना पाहावयास मिळते. येणाऱ्या भक्तांसाठी देवस्थान समितीकडून सर्व सोया सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
नक्की वाचा : ठरलं तर मग!हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार
भक्तांच्या नवसाला पावणारी मोहटादेवी (Mohatadevi)
नवरात्रीच्या कालावधीत दैनंदिन कीर्तन, प्रवचन, भजन, जागर, गोंधळ, हरिपाठ , सप्तशती पाठ, होमहवन असे कार्यक्रम गडावर होणार आहेत. भक्तांच्या नवसाला पावणारी मोहटादेवी संकटकाळी भक्ताच्या हाकेला ओ, देते अशी भावना देवी भक्तांमध्ये आहे. राज्यातून तसेच राज्याबाहेरून लाखो भाविक मोहटादेवीच्या दर्शनासाठी गडावर यात्रेसाठी येतात. भक्ताच्या भक्तीला प्रसन्न होऊन मोहटादेवी मोहटागडावर स्वयंभू स्थान आहे. माहूरच्या देवीचे अंशात्मक पीठ मोहटादेवीचं आहे. मोहटा देवस्थान समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले
नवरात्र उत्सव काळासाठी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. घटस्थापनेच्या दिवशी हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी पायी येत होते. नवरात्रात काळात चांदीचे पंचदेवता मंदिर गाभाऱ्यात देवी समवेत स्थापित करण्यात येतात. देवस्थानचे वेदशास्त्र संपन्न भूषण साखरे, भास्कर देशपांडे, नारायण सुलाखे, बाळासाहेब क्षिरसागर यांनी घटस्थापनेचे पौरोहित्य केले. नवरात्र काळात मोहटादेवीच्या मंदिर गाभाऱ्यातून व्हीआयपी दर्शन विश्वस्त मंडळांनी पूर्णतः बंद केले आहे. त्यामुळे व्हीआयपी दर्शनाचा आग्रह कोणत्याच भाविकांनी धरू नये, असे आवाहन देवस्थान समितीकडून करण्यात आले आहे.