Mohta Devi : पाथर्डी : शारदीय नवरात्र उत्सवाच्या (Sharadiya Navratri Festival) पार्श्वभूमीवर मोहटादेवी (Mohta Devi) गडावर यंदा विक्रमी भाविकांची गर्दी अपेक्षित आहे. भाविक भक्तांची सुरक्षितता, वाहतूक सुलभता व शिस्तबद्ध दर्शन याची विशेष काळजी घेण्यासाठी यावर्षी अधिकचा पोलीस बंदोबस्त (Police Arrangement) उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिले.
अवश्य वाचा: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका ताकदीने लढवणार: खासदार लंके
मोहटादेवी देवस्थानला भेट देऊन केली पाहणी
घार्गे यांनी नुकतीच मोहटादेवी देवस्थानला भेट देऊन पाहणी केली, यावेळी ते बोलत होते. यावेळी शेवगाव पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश उगले, पाथर्डी पोलीस निरीक्षक विलास पुजारी, विश्वस्त बाळासाहेब दहिफळे, शशिकांत दहिफळे, देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, जनसंपर्क अधिकारी भिमराव खाडे उपस्थित होते.
नक्की वाचा: नगर-मनमाड रस्त्यावर पुन्हा अपघात; नागरिकांसह माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंचे रास्ता रोको आंदोलन
नवरात्र महोत्सवात लाखो भाविक येतात दर्शनासाठी (Mohta Devi)
पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी गडावर दरवर्षी नवरात्र महोत्सवात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. शारदीय नवरात्र महोत्सवास २२ सप्टेंबर २०२५ रोजी प्रारंभ होत आहे. यावर्षीच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीची कोंडी टाळणे, भाविकांना नियोजित मार्गाने दर्शन घडविणे, तसेच अतिक्रमणावर नियंत्रण ठेवणे या दृष्टीने सर्वंकष योजना आखण्यात आली आहे.
यंदा स्थानिक पोलीस दलाबरोबरच राज्य राखीव पोलीस दल, गस्ती पथक व दंगल नियंत्रण पथकांचीही प्रभावी नेमणूक केली जाणार आहे. देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी भणगे यांनी यंदाच्या महोत्सवासाठी आवश्यक बंदोबस्ताबाबत माहिती देत, मागील वर्षाच्या तुलनेत वाढीव बंदोबस्ताची मागणी केली. त्यानुसार भाविक भक्तांच्या सुरक्षिततेसाठी वाढीव राज्य राखीव पोलीस दल, गस्ती पथक व दंगल नियंत्रण पथक यांची नियुक्ती करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी संबंधितांना दिले. सोमनाथ घार्गे यांनी देवीची आरती करून दर्शन घेतले. देवस्थान समितीच्या वतीने त्यांचे स्वागत करून सन्मान करण्यात आला.