Mohta Devi : पाथर्डी : येथील एस.टी. आगाराची (ST Bus) ३४ वर्षांची परंपरा कायम ठेवत वाजतगाजत मोहटादेवीस (Mohta Devi) साडी-चोळी अर्पण करण्यात आली. नवरात्री उत्सवानंतर दरवर्षी कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी पार पडणारी पाथर्डी (Pathardi) एस.टी. आगाराची पारंपरिक मिरवणूक यंदाही भक्तिभावात पार पडली.
अवश्य वाचा : शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावा; ‘राष्ट्रवादी’चे पोलीस अधीक्षकांना निवेदन
मोहटादेवी माते की जय असा जयघोष
पाथर्डी एस.टी. आगाराच्या वतीने मोहटादेवीच्या प्रतिमेची वाजतगाजत मिरवणूक काढून देवीस साडी-चोळी अर्पण करण्यात आली. आगाराच्या परिसरातून मोहटादेवीची सुशोभित प्रतिमा एस.टी. बसच्या पुढील भागात ठेवण्यात आली होती. महिला वाहकांनी डोक्यावर पूजेची ताटे घेत भक्तिभावाने मिरवणुकीत सहभाग घेतला, तर चालकांनी भगव्या टोप्या परिधान करून मोहटादेवी माते की जय अशा जयघोषात वातावरण दुमदुमून गेले.
नक्की वाचा : किसान सभेसह विविध संघटनांची शुक्रवारी आंदोलनाची हाक
देवीच्या प्रतिमेची भक्तिभावाने गड प्रदक्षिणा (Mohta Devi)
मिरवणुकीचा प्रारंभ पाथर्डी आगार स्थानकातून झाला आणि देवीच्या प्रतिमेची भक्तिभावाने गड प्रदक्षिणा घालत मोहटादेवी गडावर साडी-चोळी अर्पण करण्यात आली.मिरवणुकीत आगारातील अधिकारी, कर्मचारी, महिला वाहक तसेच नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. मिरवणुकीदरम्यान पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि देवीचे गजर यांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय बनवले.
पाथर्डी व परिसरात मोहटादेवी आणि मढी येथे दरवर्षी यात्रोत्सव मोठ्या प्रमाणात भरवला जातो. राज्यभरातून हजारो भाविक या यात्रांना हजेरी लावतात. या काळात पाथर्डी आगाराला प्रवाशांच्या मोठ्या संख्येमुळे चांगले उत्पन्न मिळते. त्यामुळे आगार आर्थिक तोट्यात असला तरी या यात्रांमुळे तोटा मोठ्या प्रमाणावर कमी होतो. देवीवरील श्रद्धेमुळे पाथर्डी आगारातील अधिकारी आणि कर्मचारी दरवर्षी स्वतःहून वर्गणी गोळा करून मोहटादेवीच्या प्रतिमेची मिरवणूक काढतात आणि देवीस साडी-चोळी अर्पण करतात. या प्रसंगी अनेक भाविक महिलांनी देवीची पूजा केली.