Monika Rajale : पाथर्डी : आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) यांच्यावर जमावाकडून दगडफेक करण्याचा प्रकार बुधवारी (ता.२०) सायंकाळी तालुक्यातील शिरसाटवाडी येथील मतदान केंद्रावर झाला. तर आक्रमक जमावापासून बचाव व्हावा, म्हणून राजळे यांनी कार्यकर्त्यांसह स्वतःला मतदानकेंद्राच्या खोलीत कोंडून घेतले. उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांनी मोठा पोलीस बंदोबस्त घेत दोन तास मतदानकेंद्रात बसून असलेल्या राजळे यांची सुटका केली. तर या घटनेने संतप्त झालेल्या हजारो राजळे समर्थकांनी रात्री शहरातील अहिल्यानगर रोडवरील माणिकदौंडी चौकात रास्ता रोको आंदोलन सुरु केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
नक्की वाचा : महायुतीच्या १६० पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, सूरज चव्हाण यांचा दावा
राजळे व त्यांचे चार समर्थक किरकोळ जखमी
या घटनेत राजळे व त्यांचे चार समर्थक किरकोळ जखमी झाले असून या प्रकरणी मात्र राजळे यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने या संदर्भात रात्री उशिरापर्यंत कोणत्याही गुन्ह्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली नव्हती. या प्रकरणाने मात्र किरकोळ शाब्दिक चकमक वगळता शांततेत पार पडलेल्या मतदान प्रक्रियेस गालबोट लागले. आज सायंकाळी राजळे या शिरसाटवाडी मतदानकेंद्रावर वाद सुरु असल्याचे समजल्यावर त्या ठिकाणी गेल्या असता तेथे शेकडो युवक जमा झाले व त्यांनी राजळे यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली. पोलिसांनी या तरुणांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसदल अपुरे असल्याने उपयोग झाला नाही. यानंतर राजळे यांच्या दिशेने दगडफेक करण्यात आली. ती चालू असतानाच राजळे यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदानकेंद्राच्या खोलीत नेले. यावेळी मतदानप्रक्रिया संपलेली होती. यावेळी जवळपास एक तास वीज गायब झाल्याने राजळे यांना काही काळ अंधारात बसावे लागले.
अवश्य वाचा : माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या गाडीवर मध्यरात्री गोळीबार
राजळे समर्थकांकडून रास्तारोको आंदोलन (Monika Rajale)
दरम्यान, या घटनेची माहिती कळताच काही राजळे समर्थक शिरसाठवाडीकडे निघाले होते. दरम्यान पाटील व पोलीस निरिक्षक संतोष मुटकुळे हे शिरसाटवाडी येथे मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन आले व त्यांनी मतदान केंद्राजवळ जमा झालेल्या तरुणांना हुसकावून लावले. यावेळी पाटील यांच्याशी बोलताना राजळे म्हणाल्या, काही मतदानकेंद्र हे संवेदनशील असल्याचे पत्र मी आधी दिले होते. आज सकाळपासूनचे अनेक मतदानकेंद्रावर मला ठरवून विरोध करण्यात आला. शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील अनेक काही मतदान केंद्रावर जाणीवपूर्वक माझी अडवणूक करण्यात आली. यानंतर राजळे यांनी शिरसाटवाडी ते पाथर्डी या नेहमीच्या मार्गाने पोलिसांनी न आणता दुसऱ्या रस्त्यावरून पाथर्डीला आणले. दरम्यान या घटनेची माहिती कळताच राजळे यांचे हजारो समर्थक अहिल्यानगर रोडवरील माणिकदौंडी चौकात जमा झाले व त्यांनी दगडफेक करणाऱ्या तरुणावर तातडीने गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा, अशी मागणी करत रास्तारोको आंदोलन सुरु केले. त्यानंतर आमदार मोनिका राजळे काही तासानंतर चौकात आल्या. त्यावेळी आंदोलकांना शांत करत त्यांनी कोणत्याही घोषणाबाजी देऊ नये, तुम्ही केलेल्या सहकार्यामुळे मी सुखरूप आहे. सर्वांनी शांततेत घरी जावे, असे आवाहन केल्यानंतर हजारो कार्यकर्ते तेथून निघून गेले.
शिरसाटवाडीच्या माणिकदौंडी रोडवर फाट्यावर काही गाड्यांच्या काचा फोडल्याची घटना घटली. बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पाथर्डी शहरातील कोरडगाव चौकामध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. पोलिसांनी येऊन हाणामारी करणाऱ्या युवकांवर काठीच्या साह्याने बळाचा वापर केला. दरम्यान, मतदानाच्या वेळी टाकळीमानुर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शेकडो कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर येथील वातावरण निवळले.