Monika Rajale : पाथर्डी : मागील दोन-तीन दिवसांपासून पाथर्डी व शेवगांव तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाने (Heavy Rain) अक्षरशः हाहाकार माजवला आहे. नद्या-नाले तुडुंब भरून वाहू लागले असून नदीकाठच्या शेतजमिनींमध्ये तसेच वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे शेतपिकांचे, शेतीचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीत नुकसानीची तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत, अशा सूचना आ. मोनिका राजळे (Monika Rajale) यांनी महसूल व कृषी विभागाच्या (Agriculture Department) अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
नक्की वाचा: सर्व मागण्यांची अंमलबजावणी घेतल्याशिवाय मागे हटणार नाही : मनोज जरांगे पाटील
पावसामुळे मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड
पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव, खरवंडी, येळी, अकोला, टाकळीमानूर परिसरासह शेवगांव तालुक्यातील मुंगी, एरडगाव, चापडगाव, बोधेगाव, दहिगाव ने, ढोरजळगाव आदी गावांमध्ये पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. नद्यांना पूर आल्याने नदीकाठच्या शेतजमिनी जलमय झाल्या असून उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतातील बांध तुटले असून घरांची पडझड झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. विशेषतः शेवगांव तालुक्याच्या पूर्व भागात पावसामुळे मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड झाल्याची माहिती समोर आली आहे.
आवश्य वाचा : गणेशोत्सवात नागरिकांच्या मदतीसाठी ‘पोलीस मित्र’
तातडीने मदत मिळवून देण्याच्या सूचना (Monika Rajale)
या दोन्ही तालुक्यांमधील आपत्तीजन्य परिस्थितीची गंभीर दखल घेत आ. मोनिका राजळे यांनी तहसिलदार, तालुका कृषी अधिकारी तसेच महसूल व कृषी विभागाच्या अन्य अधिकाऱ्यांना तातडीने पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करून मदत मिळवून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी मुसळधार पावसाने तालुक्यातील सर्वच मंडळांना झोडपून काढले. वादळ, विजांचा कडकडाट आणि पावसाच्या सरींनी गावोगावी भीतीचे वातावरण निर्माण केले. अनेक मोठे तलाव व बंधारे भरून वाहू लागले आहेत. काही ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटना घडल्या असून पाऊसात जनजीवन विस्कळीत झाले होते.मध्यंतरी अनेक दिवस पावसाने दडी मारली होती; मात्र अचानक झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. उभ्या पिकांचे नुकसान, घरांची पडझड आणि जनावरांवर आलेले संकट या सर्व परिस्थितीत शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.