Moon : नगर : न्यूयॉर्क (New York) येथील आर्ट रिन्यूअल सेंटर हे जगभरातील वास्तववादी कलाकृतीचे प्रदर्शन दरवर्षी भरवते. यामध्ये अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील राहुरी येथील चित्रकार (Painter) नुरील भोसले यांची कलाकृती अंतिम यादीत आली आहे. ही कलाकृती चंद्रावरही (Moon) संग्रहित करण्यात येणार आहे. व्यक्ती व पशू याचे भावनिक नाते दाखविणारे चित्र त्यांनी रेखांकनातील अतिशय अवघड समजल्या जाणाऱ्या स्टिपलिंग प्रकारात म्हणजे बिंदू देऊन चित्र रेखाटून 44 बाय 35 इंच आकारात दर्जेदारपणे पुर्ण केले आहे. यासाठी त्यांना तब्बल चार वर्षे लागली.
नक्की वाचा : ‘एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी’-रोहित पवार
चार वर्षाच्या प्रदिर्घ कष्टातून साकारले चित्र
दरवर्षी न्यूयॉर्क येथील आर्ट रिन्यूअल सेंटर या स्पर्धेत विविध विभागात वास्तववादी कला सादर करण्यासाठी जगभरातील मातब्बर कलाकार प्रयत्नांची पराकाष्टा करत असतात. राहुरी येथील नुरील प्रभात भोसले यांच्या रेखांकनाला सलग तिसऱ्यांदा हा बहुमान मिळाला आहे. त्यांच्या कलाकृतीची निवड अंतिम यादीत झाली असून, द कॅम्पॅनीयन (सोबती) असे त्यांच्या चित्राचे नाव आहे. राहुरी येथील मखना (मका) या गोपाळ व्यक्तीची व त्याच्या म्हशीचे (रबडी) चित्र स्टिपलिंग माध्यमात त्यांनी साकारले आहे. रेखांकनातील अतिशय अवघड समजला जाणारा स्टीपलिंग प्रकार म्हणजे विशिष्ट पेनाने कागदावरती जवळजवळ बिंदू देऊन चित्र रेखाटने. चार वर्षाच्या प्रदिर्घ कष्टातून त्यांनी चित्र साकारले आहे.
अवश्य वाचा : अवैध दारू विरोधात महिला आक्रमक; दुकान पेटवले
5 हजार कलाकृतींनी केला होता अर्ज (Moon)
या स्पर्धेमध्ये जगभरातून सुमारे 87 देशांच्या 5 हजार कलाकृतींनी अर्ज केला होता. यातील 24 टक्के म्हणजेच 1226 कलाकृतींची निवड करण्यात आली असून, यातील निवडक कलाकृतींचे प्रदर्शन न्यूयॉर्क शहरांमध्ये भरविण्यात येणार आहे. मानवाने निर्माण केलेल्या अजरामर कलाकृती चंद्रावरही जतन केल्या जाव्यात, या प्रकल्पासाठी लुनर (चंद्र) कोडेक्स या प्रणालीने एक विशेष तंत्रज्ञान भौतिक विज्ञानी कला संग्रहकर्ता सॅम्युअल पेराल्टा (कॅनडा) यांच्या अध्यक्षतेखाली विकसित केला आहे. ज्यात जगभरातील सुमारे 157 देशातील 30 हजार अतुलनीय कलाकृती चंद्रावरती डिजिटल स्वरूपात पाठवून संग्रहित ठेवण्यात येणार आहेत. यामाध्ये चित्र, संगीत, फिल्म, कविता, लिखाण यांचा समावेश आहे.