MPKV : राहुरी : बदलत्या हवामानाचा परिणाम शेतीवर होत आहे. जमिनीचे आरोग्य खालावले असून त्याचा परिणाम पिकांच्या उत्पादकतेवर होत आहे. विद्यापीठामध्ये सेंद्रिय शेतीबरोबरच नैसर्गिक शेतीचे प्रयोग सुरु आहे. याचबरोबर शेती शाश्वत कशी करता येईल, या विषयीचे संशोधन करावे लागेल. या विद्यापीठाचे देशात व देशाबाहेर मोठे नाव आहे. हे विद्यापीठ इतर कृषी विद्यापीठांसाठी दीप स्तंभाप्रमाणे आहे. या विद्यापीठात काम करणे याचा सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे (MPKV) नवनियुक्त कुलगुरु (Vice Chancellor) डॉ. विलास खर्चे (Dr. Vilas Kashinath Kharche) यांनी केले.
अवश्य वाचा : शिर्डीत एका महिलेच्या नावे दुसऱ्याच व्यक्तीने केले मतदान
विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा पदभार स्विकारला
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा पदभार स्विकारल्यानंतर विद्यापीठात आयोजीत केलेल्या सत्कार समारंभात सत्काराला उत्तर देतांना कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व राहुरी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. शरद गडाख होते. याप्रसंगी व्यासपीठावर मंदाकीनी गडाख, सुरुची खर्चे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, नियंत्रक सदाशिव पाटील, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, प्रभारी कुलसचिव विजय पाटील, नागपूर येथील कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश कडू, डॉ. कौस्तुभ खर्चे उपस्थित होते.
नक्की वाचा : जिल्ह्यात ४ डिसेंबरपर्यंत थंडीच्या लाटेची शक्यता; दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
डॉ. विलास खर्चे मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले की, (MPKV)
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधनामध्ये भरीव कामगिरी केलेली आहे. या विद्यापीठाची उंची कायम ठेवण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने पूर्ण क्षमतेने प्रयत्न करु. प्रत्येकाने समर्पण वृत्तीने काम केले तर निश्चितच राज्यातील शेतकरी, राज्याच्या प्रगतीबरोबरच सर्वांची प्रगती होईल. पिकांची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी विद्यापीठातील ड्रोन तंत्रज्ञान, कृत्रिम बुध्दीमत्ता, रिमोट सेंसिंग या सारख्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची मदत घेतली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी कुलगुरुपदी निवड केल्याबद्दल त्यांनी राज्यपालांचे आभार मानले. अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना डॉ. शरद गडाख म्हणाले की, महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी 321 पेक्षा जास्त वाण, 55 यंत्रे तर 2000 पेक्षा जास्त तंत्रज्ञान शिफारशी दिलेल्या आहेत. भविष्यात संशोधन करतांना शेतकऱ्यांची गरज ओळखून संशोधनावर भर द्यावा लागेल. सध्या विद्यापीठातील 65 टक्के जागा रिक्त आहेत. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेकडून मिळणारा निधी तसेच राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान कमी झाले आहे. विद्यापीठ आत्मनिर्भर होण्यासाठी बिजोत्पादन व विविध कृषी निविष्ठा मोठ्या प्रमाणात उत्पादन करणे त्याचबरोबर नवनविन प्रकल्प शासनाकडून मंजुर करुन घेणे महत्वाचे ठरणार आहे.
येथून पुढे सर्वांनी जबाबदारीने काम करुन एका दिशेने, एका विचाराने व एका ध्येयाने आपले कार्य पुढे नेण्याचे महत्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तीन विद्यापीठांचे कुलगुरुपद भुषविण्यास मिळाले त्याबद्दल त्यांनी राज्यपालांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विठ्ठल शिर्के यांनी केले. यावेळी डॉ. साताप्पा खरबडे, डॉ. गोरक्ष ससाणे, डॉ. प्रशांत बोडके, डॉ. प्रकाश कडू, इंजि. मिलिंद ढोके, डॉ. नितीन दानवले व डॉ. महाविरसिंग चौहान यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी काष्टी येथील कृषी विज्ञान संकुलाचे प्रमुख डॉ. सचिन नांदगुडे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे, कृषिभूषण सुरसिंग पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी तर आभार विजय पाटील यांनी मानले. या कार्यक्रमासाठी अकोला कृषी विद्यापीठाचे अधिकारी, दापोली कृषी विद्यापीठाचे अधिकारी, राहुरी कृषी विद्यापीठाचे सर्व सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, निवृत्त शास्त्रज्ञ, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



