राहुरी : शारीरिक स्वास्थ्याबरोबरच उत्तम आरोग्यासाठी सर्वांनीच आपल्या आहारामध्ये भरडधान्याचा (Grains) भरपूर वापर केला पाहिजे,असे मत राहुरी कृषी विद्यापीठातील (Mahatma Phule Krishi Vidyapeeth) ज्वारी सुधार प्रकल्पाचे प्रमुख सहयोगी प्राध्यापक डॉ.उदयकुमार दळवी (Dr. Uday Kumar Dalvi) यांनी व्यक्त केले.
राहुरी येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथील राष्ट्रीय छात्र सेना(एन.सी.सी.) व कला मंडळातील अर्थशास्त्र विभागाअंतर्गत “आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष २०२३” (International Year of Whole Grains 2023 ) निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. अनिता वेताळ, हवालदार अरुण खरात,राष्ट्रीय छात्र सेना विभागप्रमुख प्रा.संदीप पेरणे उपस्थित होते.
नक्की वाचा : ‘पोलिसांच्या आतही असतो माणुसकीचा झरा’ : शिवाजी डोईफोडे
डॉ दळवी पुढे म्हणाले, हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरविले आहे. भरडधान्यांचा आहारातील वापर वाढावा व सर्व समाजाचे आरोग्य सदृढ रहाणे महत्त्वाचे आहे. बाजरी,ज्वारी,नाचणी,राळा, राजगिरा, वरई,यासारख्या भरडधान्याचा आपल्या आहारातील समावेश अतिशय महत्वाचा आहे. यामध्ये अधिक पोषणमूल्य असून प्रथिने, तंतुमय पदार्थ, कर्बोदके, खनिज पदार्थ, स्निग्ध पदार्थाचे प्रमाण अधिक आहे. शरीरातील कॅलरीज व जीवनसत्वाचा भरपूर मोठा साठा यामध्ये आहे.
अवश्य वाचा : गरजू मुलींसाठी पोलिसांचा ‘एक सायकल लेकीसाठी’ उपक्रम
सोडिअम,कॅल्शियम,फॉस्फरस,लोह,झिंक,कॉपर,खनिजे,मॅग्नेशियम,फॉस्फ रस या व इतर घटकांचे प्रमाण अधिक आहे. ज्यांची मानवी शरीरासाठी अत्यंत आवश्यकता आहे. भरडधान्याच्या सेवनाने अनेक आजारांवर मात करता येते.मधुमेह,उच्च रक्तदाब,कोलेस्टेरॉल, हृदय विकार,ऍसिडिटी,गॅसेस व पोटाचे विकार यासारखे अनेक आजरांवर रामबाण उपाय म्हणून भरडधान्याचे सेवन केले पाहिजे. ज्वारी ही शरीरासाठी अत्यंत पौष्टीक असून मधुमेहाच्या रुग्णाने ज्वारीचा नियमित आपल्या आहारात समावेश केला पाहिजे. ज्वारी शरीरासाठी कशी गुणकारी आहे याचे सखोल विश्लेषण त्यांनी यावेळी आपल्या व्याख्यानात केले.
ते असेही म्हणाले, गव्हात ग्लुटोनचे प्रमाण अधिक असते. त्याचा परिणाम पोटाचा घेर वाढण्यावर होतो. यातून अपचनासारखा आजार होतो. हृदय विकार व उच्च रक्तदाब यासारखे विकार यातून निर्माण होतात. सर्वांनी चांगली जीवनशैली व्यतीत करण्यासाठी आपल्या आहारात भरडधान्यांचा वापर वाढवला पाहिजे. अलीकडील काळात फास्ट फूडचा वापर मोठ्या प्रमाणावर आहारात वाढत आहे. याचा परिणाम विशेषतः लहान मुलांमध्ये अधिक दिसतो. खेळासाठी पुरेशी मैदाने नाही, त्याची जागा मोबाईल नावाच्या उपकरणांनी घेतली.याचा वाईट परिमाण शरीराबरोबरच मानवी मेंदूवर होत आहे. ज्यातून भविष्यात अनेक समस्या उद्भवतील यावर आपण आधीच नियंत्रण मिळवायला हवे,अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.अनिता वेताळ,प्रा विद्या थोरात,प्रा.वैशाली कुलकर्णी, प्रा. प्रतीक्षा देशमुख, प्रा.रंगनाथ खिलारी,प्रा.संदीप मगर,जगन्नाथ इंगळे उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे प्रशासन अधिकारी दिपक पराये ,अधीक्षक अंबादास पारखे ,प्रा.गीताराम चोथे सर, दत्तात्रय कोहकडे यांनी मार्गदर्शन केले.