MPSC : नगर : आयबीपीएस (IBPS) परीक्षा आणि एमपीएससीची (MPSC) राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा २५ ऑगस्ट रोजी होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्यातरी एका परीक्षेला मुकावे लागणार होते. तसेच २५ ऑगस्टला एमपीएससीकडून होणाऱ्या परीक्षेत कृषी विभागाच्या २५८ पदांचा समावेश करण्याची मागणी करत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्री सुरू केलेले ठिय्या आंदोलन बुधवारीही सुरू ठेवले होते. त्यांच्या या आंदोलनाला खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भेट घेऊन पाठिंबा दिला. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना याबाबत लक्ष घालून विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली. याबाबत दखल घेत फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला विदयार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली.
नक्की वाचा: ‘आमचा मुलगा निर्दोष आहे’,बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या आई-वडिलांचा मोठा दावा
सुधारित दिनांक लवकरच जाहीर करण्यात येणार
फडणवीसांच्या मागणीनंतर आज (२२ ऑगस्ट) सकाळी दहा वाजता एमपीएससीची बैठक झाली. यामध्ये एमपीएससीतर्फे राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २५ ऑगस्ट रोजी होत आहे. या बैठकीत रविवारी (२५ ऑगस्ट) नियोजित असलेली महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा सुधारित दिनांक लवकर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाने दिली.
अवश्य वाचा: ‘बदलापूरच्या घटनेत राजकारण आहे म्हणणारेही विकृत’; उद्धव ठाकरेंचा संताप
कृषी सेवेतील पदांचा समावेश शक्य नाही (MPSC)
तसेच कृषी सेवेतील २५८ पदांचा समावेश याच परीक्षेत करण्याची स्पर्धा परीक्षार्थींची मागणी आहे. मात्र या परीक्षेसंदर्भात २९ डिसेंबर, २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत एमपीएससीकडे महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा २०२४ साठीचे मागणीपत्र शासनाकडून प्राप्त झाले नाही. त्यामुळे कृषी सेवेतील पदांचा समावेश जाहिरातीमध्ये करणे शक्य झाले नाही असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सांगितले आहे. आता या परीक्षेची तयारी झाली असून, कृषी सेवेच्या मागणीपत्रातील पदांच्या भरती प्रक्रियेबाबत पुढील नियोजन लवकरात लवकर करण्यात येईल, असे परिपत्रक एमपीएससीने मंगळवारी प्रसिद्ध केले.