MPSC Exam Pass : कोपरगाव : कष्ट आणि जिद्द या दोन शब्दांचा अर्थ काय असतो, हे कोपरगावच्या एका कन्येने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आलेल्या उषा गंगाधर पवार या तरुणीने एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण (MPSC Exam Pass) होऊन क्लास वन अधिकारी (Class One Officer) होण्याचं तिचं स्वप्न पूर्ण केलं आहे. तिच्या या यशाने केवळ तिचं घरच नव्हे, तर संपूर्ण कोपरगाव शहर गहिवरून गेलं आहे.
नक्की वाचा : आमदार संग्राम जगताप झाले संतप्त; स्वच्छता निरीक्षकांची घेतली झाडाझडती
भावाचा बूट पॉलिश करून बहिणीच्या शिक्षणासाठी हातभार
कोपरगाव शहरातील सुभाष नगर भागात राहणाऱ्या उषाच्या जीवनात लहानपणीच नियतीने एक मोठा आघात केला. वडिलांचं छत्र हरपलं. त्यानंतर तिची आई अहिल्याबाई यांनी एक क्षणही न डगमगता कुटुंबाचा आधारस्तंभ बनण्याचा निर्णय घेतला. अहिल्याबाई यांनी मिळेल ते सफाईचं काम करून घर चालवलं. तर भाऊ ज्ञानेश्वर पवार याने शहरातील रस्त्यांवर बूट पॉलिश करून बहिणीच्या शिक्षणासाठी हातभार लावला. आई आणि भावाने केलेल्या त्यागाला उषाने कधीच वाया जाऊ दिलं नाही.
अवश्य वाचा: युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याचा निर्धार
उत्तीर्ण झाल्याचे कळताच तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू (MPSC Exam Pass)
गुरुवारी सायंकाळी एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि उषा उत्तीर्ण झाल्याचे कळताच तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. हे अश्रू केवळ यशाचे नव्हते, तर आई आणि भावाचे अथक कष्ट फळाला आल्याचे होते. ही बातमी वाऱ्यासारखी कोपरगाव शहरात पसरली. सुभाष नगरसह शहरातील विविध भागांतील नागरिकांनी उषाचे अभिनंदन करण्यासाठी तिच्या घरी गर्दी केली होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत यशाचं शिखर गाठणाऱ्या उषाने आपल्या यशाचं संपूर्ण श्रेय तिची कर्तव्यनिष्ठ आई आणि त्यागी भाऊ यांना दिलं आहे.”माझं हे यश फक्त माझं नाही, हे माझ्या आईच्या घामाचं आणि भावाच्या कष्टाचं फळ आहे. त्यांनी माझ्यासाठी जे काही केलं, त्याची परतफेड मी सेवेतून करू शकेन, हीच माझ्यासाठी खरी अभिमानाची गोष्ट आहे, असे तिने म्हटले आहे.



