
MPSC Preliminary Exam : नगर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) आयोजित ‘महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५’ (Preliminary Examination) रविवारी (ता. ११) सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत जिल्ह्यातील २१ परीक्षा उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. परीक्षा उपकेंद्रांच्या परिसरात कोणताही गैरप्रकार होऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी आयोगाचे केंद्रप्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते (Dadasaheb Gite) यांनी परीक्षा उपकेंद्राच्या १०० मीटर परिसरात सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
अवश्य वाचा : सावेडी, बोल्हेगाव, केडगाव व तपोवन उपनगरांसाठी १०० कोटींहून अधिक निधी!: डॉ. सुजय विखे पाटील
परीक्षा केंद्रावर सकाळी ९.३० वाजल्यापासून प्रवेश
या परीक्षेसाठी जिल्ह्यातून एकूण ७ हजार १९८ उमेदवार बसणार आहेत. या परीक्षेच्या कामकाजासाठी ५ उपजिल्हाधिकारी दर्जाचे समन्वय अधिकारी, १ उपजिल्हाधिकारी दर्जाचे भरारी पथकातील अधिकारी, २१ उपकेंद्रप्रमुख (वर्ग-१ अधिकारी), ७१ पर्यवेक्षक, ३२८ समवेक्षक, समन्वय अधिकारी व भरारी पथकांचे १ सहाय्यक, ४२ लिपिक, १९ केअरटेकर, १७ बेलमन, २१ शिपाई, ७४ पाणी वाटप कर्मचारी व २७ वाहनचालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उमेदवारांना परीक्षा केंद्रावर सकाळी ९.३० वाजल्यापासून प्रवेश देण्यात येईल. त्यांनी आयोगाने दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक पालन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
नक्की वाचा : सिसपे घोटाळ्याप्रकरणी तपासाला निर्णायक वळण; पोलीस अधीक्षक घार्गे यांनी पत्रकार परिषदेत दिली ही माहिती
प्रवेशपत्रे आयोगाच्या संकेतस्थळावरूनच डाऊनलोड करावे (MPSC Preliminary Exam)
परीक्षा कक्षात मोबाईल, कॅल्क्युलेटर, डिजिटल डायरी, पेजर, मायक्रोफोन आदी दूरसंचार साधने आणणे व परीक्षा केंद्र परिसरात बाळगणे निषिद्ध आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्रे आयोगाच्या संकेतस्थळावरूनच डाऊनलोड करून घ्यावीत; दुय्यम प्रवेश प्रमाणपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयातून दिली जाणार नाहीत. तसेच, परीक्षा उपकेंद्राच्या १०० मीटर परिसरातील सर्व एस.टी.डी. बुथ, फॅक्स आणि झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत


