Muharram : नगर : नगर शहरातील ऐतिहासिक (Historic) व धार्मिक महत्त्व असलेल्या मोहरममधील इमाम हसन व इमाम हुसेन यांच्या सवारी विसर्जन मिरवणुकीसह रात्रीची ‘कत्तल ची रात’ मिरवणूक शांततेत पार पडली. या दोन्ही मिरवणूका रेंगाळल्या असल्या तरी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. नगरच्या मोहरम (Muharram) मिरवणुकीतील इमाम हसन व इमाम हुसेन सवार्या मुस्लिम (Muslim) व हिंदू धर्मीयांच्या श्रद्धेचे प्रतिक समजल्या जातात. भाविक त्यास नवसही बोलतात. विविध जातीधर्माचे तरुण सवार्या खांद्यावर खेळवत नेतात. दोन्ही मिरवणुका शनिवारी रात्री १२ व रविवारी दुपारी १२ वाजता पारंपारिक मार्गाने काढण्यात आल्या. त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
नक्की वाचा : नगरकरांमध्ये अजूनही मोटर सायकलचीच क्रेझ; कारपेक्षा ट्रॅक्टरला मागणी जास्त
शनिवारी कत्तलची रात्र मिरवणुक
शनिवारी मध्यरात्री कोठलामधून छोटे इमाम व मंगलगेट हवेली भागातून बडे इमाम यांच्या सवार्यांची कत्तलची रात्र मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत पाच टेंभ्यांना परवानगी देण्यात आली होती. मध्यरात्री १२ वाजता मिरवणुकीस सुरुवात झाली. मंगलगेट हवेली, दाळ मंडई-तेलीखुंट, शहाजी रास्ता, मोची गल्ली, जुना बाजार, अर्बन बँक रस्ता, आनंदी बाजार, कोर्टगल्ली, सबजेल चौक, जुनी महापालिका, पंचपीर चावडी, धरती चौक, हातमपुरा, रामचंद्र खुंट मार्गाने सवार्या सकाळी पुन्हा आपापल्या जागी नेण्यात आल्या.
अवश्य वाचा : राशीनमध्ये सुगंधी तंबाखू आणि गुटखा पकडला; साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत
रविवारी दु. १२ वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात (Muharram)
त्यानंतर रविवारी दुपारी १२ वाजता विसर्जन मिरवणुकीला पुन्हा सुरुवात झाली. दोन्ही सवार्या खेळवत पारंपारिक मार्गाने नेण्यात आल्या. विविध ठिकाणी भाविक त्यावर फुलांची चादर पांघरत होते. सावयर्यामागे नवस बोललेले भाविक मोर्चण व ताबूत घेऊन सहभागी होते. मात्र, ही मिरवणूक सुरुवातीपासूनच रेंगाळली. दिल्लीगेटमार्गे जुन्या सावेडी गावात सवार्यांचे रात्री विसर्जन करण्यात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.