Mukhyamantri Vayoshri Yojana : नगर : मनःस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र आदीद्वारे ज्येष्ठ नागरिकांचे (Senior Citizen) मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ्य अबाधित ठेवता येणार आहे. तसेच ज्येष्ठांना वयोमानानुसार भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक विविध समस्येवर मात करून त्यांचे जीवनमान सुखकर करण्याकरिता राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ (Mukhyamantri Vayoshri Yojana) राबविण्यास राज्य शासनाने (State Govt) मान्यता दिली आहे.
नक्की वाचा : महापालिका कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू
साधने, उपकरणे पुरविणार
सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या सुमारे ११ कोटी २४ लाख आहे. त्यापैकी सद्यस्थितीत ६५ वर्षे व त्यावरील अंदाजे एकूण १ कोटी ५० लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. आज मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना विविध आजारपणाचा सामना करावा लागतो. केंद्र शासनाने सुरू केलेल्या योजनेच्या धर्तीवर दारिद्र्य रेषेखालील संबंधित दिव्यांग, दुर्बलताग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्य साधने, उपकरणे पुरविण्यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ सुरू करण्यात आली आहे.
अवश्य वाचा : आमदार थोरात यांचा “उत्कृष्ट संसदपटू” पुरस्काराने गौरव
ज्येष्ठ नागरिकांना लाभ घेता येणार (Mukhyamantri Vayoshri Yojana)
ज्येष्ठ नागरिकांना चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी- ब्रेस, सर्वाइकल कॉलर आदी सहाय्यभूत साधने, उपकरणे खरेदी करता येणार आहेत. मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी योगोपचार आदीचा लाभ घेता येईल. या योजनेकरिता राज्य शासनातर्फे १०० टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांना एकवेळ एकरकमी ३ हजार रुपयांच्या लाभ देण्यात येणार आहे. केंद्र शासनाचा कार्मिक विभाग तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणीकृत योगोपचार केंद्र, मनःस्वास्थ्य केंद्र, मनशक्ती केंद्र, प्रशिक्षण केंद्राचा ज्येष्ठ नागरिकांना लाभ घेता येणार आहे.
नगर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ लाख ३७ हजार ७६३ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी कर्जत तालुक्यातून १२ हजार ९९२, जामखेड ८ हजार ६०, श्रीरामपूर ९ हजार १९८, नगर ७ हजार १९७, पारनेर १५ हजार ५८२, कोपरगाव ९ हजार ७२४, पाथर्डी ७ हजार ७३८, राहुरी ११ हजार ६०२, राहाता १ हजार ८००, शेवगाव ८ हजार ३९८, नेवासे १२ हजार २७, संगमनेर १७ हजार ८५८, अकोले ७ हजार १३० आणि श्रीगोंदे तालुक्यातून ८ हजार ४५७ अर्ज प्राप्त झाले आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणीद्वारे लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. ही योजना वृद्धापकाळातील आरोग्यविषयक समस्या दूर करून आनंदी जीवन जगण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ : क्षेत्रफळाने व लोकसंख्येच्यादृष्टीने आपला जिल्हा मोठा आहे. शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा ज्येष्ठ नागरिकांना चांगल्याप्रकारे लाभ होऊ शकेल. वृद्धापकाळातील आरोग्यविषयक समस्या दूर करून आनंदी जीवन जगण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा जिल्ह्यातील अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांना लाभ देण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. इच्छुक नागरिकांनी त्वरित अर्ज करावा.
लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष ३१ डिसेंबर २०२३ अखेर वयाची ६५ वर्षे पूर्ण झालेले नागरिक या योजनेकरिता पात्र समजण्यात येतील. त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधारकार्ड नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्यास ओळख पटविण्यासाठी इतर स्वतंत्र ओळख दस्तऐवजही ग्राह्य धरण्यात येणार येईल. लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न २ लाख रुपयाच्या आत असणे आवश्यक आहे. याबाबत लाभार्थ्यांनी स्वयंघोषणापत्र सादर करावे. निवड किंवा निश्चित केलेल्या जिल्ह्यात एकूण लाभार्थ्यांच्या संख्येपैकी ३० टक्के महिला असणार आहे. अर्जदाराने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल. मात्र दोषपूर्ण, अकार्यक्षम उपकरणे आदीच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते. पात्र लाभार्थ्यांच्या बँकच्या खात्यात ३ हजार रुपये जमा झाल्यावर विहीत केलेली उपकरणे खरेदी केल्याचे देयक तसेच मनःस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे प्रमाणपत्र ३० दिवसांच्या आत संबंधित सहायक आयुक्त, समाजकल्याण यांच्याकडून प्रमाणित करुन घ्यावे. संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर ३० दिवसांच्या आत अपलोड करावे.
अर्जासोबत आधारकार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, पासपोर्ट आकाराचे २ छायाचित्रे, स्वयंघोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे योजनेचे लाभ घेण्यासाठी आवश्यक असणार आहे.