Munde Vs Dhakane | नगर : ऊसतोड मजुरांचे नेते असलेल्या केंद्रीय माजी मंत्री बबनराव ढाकणे (Babanrao Dhakane) व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्यात राजकीय संघर्ष होता. या दोन्ही नेत्यांच्या निधनानंतर काही वर्षे उलटूनही या दोन्ही नेत्यांच्या कुटुंबातील दुसऱ्या पिढीतही आज हा राजकीय संघर्ष पहायला मिळतोय. हाच राजकीय सत्तासंघर्ष राजळे व ढाकणे कुटुंबातही पहायला मिळत आहे. या राजकीय संघर्षाचे मैदान ठरत आहे शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघ.
अवश्य वाचा – आता मुख्यमंत्र्यांनी सांगितले तरी माघार नाही; भाऊसाहेब कांबळे यांचा पत्रकार परिषदेत निर्धार
दोघेही ऊसतोड मजुरांचे नेते (Munde Vs Dhakane)
बबनराव ढाकणे व गोपीनाथ मुंडे हे दोघेही ऊसतोड मजुरांचे मोठे नेते. अहिल्यानगर जिल्ह्यातील भगवान गडावर दोन्ही नेत्यांची तुफानी भाषणे व्हायची. मात्र, याच भगवान गडावरील सभा व ऊसतोड मजुरांच्या नेतृत्त्वावरून या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय संघर्ष सुरू झाला. हा राजकीय संघर्ष आज तागायत सुरू आहे.
हेही वाचा – संग्राम जगताप यांना नगर शहरातून माझ्यापेक्षा अधिक लीड देवून विजयी करा : डॉ.सुजय विखे पाटील
तरुण गोपीनाथ मुंडे झाले ऊसतोड मजुरांचे नेते (Munde Vs Dhakane)
राम जन्मभूमी आंदोलनानंतर जनता दल मागे पडू लागला. भारतीय जनता पक्षाचे कमळ अटल बिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांनी जनसामान्यांना माहिती करून दिले. महाराष्ट्रात भाजपला ग्रामीण भागात नेण्यासाठी गोपीनाथ मुंडे नावाचा तरुण नेता पुढे सरसावला आणि महाराष्ट्रातील ऊसतोड मजुरांच्या पट्ट्यात नव्या राजकीय नेत्याचा उदय झाला. या नेत्याचा उदय म्हणजे प्रस्थापित बबनराव ढाकणे यांच्या नेतृत्वाला आव्हान समजले जाऊ लागले. यातून या दोन्ही घरांतील राजकीय संघर्ष सुरू झाला. १९९३मध्ये गोपीनाथ मुंडे हे विधानसभेत विरोधीपक्ष नेते झाले. यामुळे त्यांचे वंजारी समाज व ऊसतोड मजुरांतील वजन वाढू लागले. यातून बबनराव ढाकणे व गोपीनाथ मुंडे यांच्यात आरोप प्रत्यारोप होत असत. यात ढाकणेंकडून पातळी सोडून आरोप झाल्याचेही सांगितले जाते. यातच बबनराव ढाकणेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वंजारी समाजाच्या आरक्षण मुद्दयाला दूर ठेवले. त्यामुळे वंजारी समाज व ऊसतोड मजूर गोपीनाथ मुंडेंच्या बाजूने गेले. त्यामुळे बीड जिल्हा व नगर जिल्ह्यातील पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील तरूणांचे मुंडे नेते झाले. यातूनच ढाकणे-मुंडे संघर्ष वाढत गेल्याचे सांगितले जाते.
राजळे-ढाकणे सत्तासंघर्ष (Munde Vs Dhakane)
ढाकणे-राजळे हा संघर्ष गेली ५० वर्षांपासूनचा आहे. प्रथमतः वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची निर्मिती स्वर्गीय दादापाटील राजळे यांनी केली. नंतरच्या काळामध्ये दादापाटील राजळे यांनी बबनराव ढाकणे यांचा संघर्ष सुरू झाला. पुढे दादा पाटील राजळे यांची सुपुत्र आप्पासाहेब राजळे हे इंजिनीयर पदवी प्राप्त झाल्यानंतर युवक काँग्रेसच्या माध्यमातून समाजकारणात आले. त्यांनी या तालुक्यामध्ये काँग्रेसचे खाते उघडले. प्रथम जिल्हा परिषद सदस्य त्यानंतर जिल्हा परिषद सभापती आणि नंतर अध्यक्ष असा त्यांचा प्रवास सुरू झाला. अध्यक्ष होण्यापूर्वी आमदारकीच्या निवडणुकीत त्यांना बबनराव ढाकणेंकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, त्यानंतर बाबुराव भापसे यांची व आप्पासाहेब राजळे यांची लढत झाली होती. त्यावेळी भापसे यांन ढाकणे यांनी पाठिंबा दिला होता. मात्र, त्यावेळी आप्पासाहेब राजळे हे विजयी झाले होते. त्यानंतर दुसऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे विक्रम आंधळे यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी बबनराव ढाकणे यांनी निवडणूक न लढवता आप्पासाहेब राजळे यांना पाठिंबा दिला होता. त्यावेळी शरद पवार यांच्या आदेशानुसार ढाकणे यांनी राजळेंना मदत केली होती. सलग दहा वर्षे ते आमदार राहिले.
त्यानंतर भारतीय जनता पक्षाने दगडू पाटील बडे यांना उमेदवारी दिली. त्यावेळी काँग्रेसकडून युवकांच्या मागणीनुसार नुकतेच आर्किटेक्चर झालेले राजीव राजळे यांनी ही निवडणूक लढवली. या निवडणुकीत प्रताप ढाकणे यांनी केलेल्या उमेदवारीमुळे मतविभाजन झाले. या मतविभाजनामुळे राजीव राजळे यांचा अल्पशा मतांनी पराभव झाला. मात्र, राजीव राजळे यांनी सलग मतदारसंघाशी संपर्क ठेवला आणि पुढील निवडणुकीत त्यांनी प्रताप ढाकणे यांचा पराभव केला. त्यानंतर मतदारसंघाचे विभाजन झाले. त्यावेळी भारतीय जनता पक्षाने प्रताप ढाकणेंना तर काँग्रेसने शेवगावचे आमदार नरेंद्र घुले यांना तिकीट दिले. यावेळी खऱ्या अर्थाने राजीव राजळे यांना डावण्यात आले. त्यामुळे त्यांनी अपक्ष राहण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी थोड्या मताने चंद्रशेखर घुले यांचा विजय झाला. त्यानंतर ढाकणे यांनी भारतीय जनता पक्ष सोडला आणि भारतीय जनता पक्षाने विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना उमेदवारी दिली. त्यांनी त्यावेळी चंद्रशेखर घुले यांचा ५८ हजार मतांनी पराभव केला. त्यावेळी ढाकणे यांनी घुले यांना साथ दिली होती.
२०१९ च्या निवडणुकीत ढाकणे यांना घुले यांनी साथ दिली. तरीही मोनिका राजळे यांचा पुन्हा विजय झाला आणि आता घुले यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी लढवण्याचे ठरवले. ढाकणे यांनी शरद पवार गटाकडे जाऊन उमेदवारी मिळवली. भाजपने पुन्हा एकदा आमदार मोनिका राजळे यांना उमेदवारी दिली आहे. या दोन्ही घराण्याचा संघर्ष अनेक वर्षापासून आहे. मात्र, या मतदारसंघांमध्ये राजळे कुटुंबाने सहकाराच्या माध्यमातून मराठा व वंजारी समाजासह सर्व जाती धर्माला सहकारात पदे देऊन सर्व समावेशक राजकारण केले आहे. हे सर्वसमावेशक राजकारण त्यांचे बलस्थान ठरत आहे. वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतही राजळे-ढाकणे सत्तासंघर्ष दिसून येतो.
पंकजा मुंडेंनी जोपासला वारसा (Munde Vs Dhakane)
एकदा भगवान गडावरील सभेतून तरुणांनी बबनराव ढाकणे यांना विरोध केला व गोपीनाथ मुंडे यांना पुढे केले. तेव्हापासून गोपीनाथ मुंडेंनी भगवान गडावरील दसरा मेळावा गाजवण्यास सुरूवात केली. बबनराव ढाकणे हे मागे पडले. गोपीनाथ मुंडेच्या निधनानंतर त्यांच्या कन्या पंकजा मुंडे या ऊसतोड मजुरांच्या नेत्या झाल्या. ऊसतोड मजुरांचे प्रश्न त्यांनी सोडवण्यासाठी प्रयत्न केले. राज्यात त्या मंत्री होत्या. बबनराव ढाकणे यांचे पुत्र प्रताप ढाकणे यांनीही राजकारणात प्रवेश करत काही काळ भाजप नंतर राष्ट्रवादी काँग्रेस अशी पक्षांतरे केली.
राजळेंना मुंडेंची साथ (Munde Vs Dhakane)
केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक स्वर्गीय गोपीनाथ मुंडे व स्वर्गीय राजीव राजळे यांनी एकत्र येऊन लढवली होती. त्यावेळी ढाकणे हे सत्ताधारी पक्षात होते. तेव्हा त्यांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप झाला होता. तेव्हा गोपीनाथ मुंडेंवरील लाठीचार्ज राजीव राजळे यांनी स्वतःच्या अंगावर घेतला होता. या पट्ट्यात पंकजा मुंडे यांचे राजकीय वजन मोठे आहे. मुंडेंनी २०१४मध्ये मोनिका राजळे यांना भाजपचे तिकीट दिले. या निवडणुकीत राजळे विजयी झाल्या. मोनिका राजळे या पंकजा मुंडे मोठ्या समर्थक समजल्या जातात. मोनिका राजळे यांचे वडीलही आमदार होते. त्यांचे गोपीनाथ मुंडे यांच्याशी मित्रत्वाचे संबंध होते. मोनिका राजळे यांचे सासर-माहेरचे कुटुंब व मुंडे कुटुंबाचे स्नेह लक्षात ठेवत पंकजा मुंडे यांनी मोनिका राजळे यांना जवळ केले. मोनिका राजळे यांना ढाकणेंविरोधात राजकीय ताकद दिली. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने प्रताप ढाकणे यांना मोनिका राजळेंच्या विरोधात उमेदवारी दिली. पंकजा मुंडे यांनी राजळेंसाठी प्रचारसभांचा धडाका लावला. या निवडणुकीतही राजळे विजयी झाल्या. यंदाच्याही विधानसभा निवडणुकीत मुंडे-ढाकणे संघर्ष पहायला मिळत आहे. मोनिका राजळे यांच्यासाठी पंकजा मुंडे प्रचारसभा घेत आहेत. तर राजळेंसमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रताप ढाकणे यांचे आव्हान उभे आहे. या राजकीय सत्तासंघर्षात कोण बाजी मारणार हे २३ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे.
राजळेंविरुद्ध सर्व (Munde Vs Dhakane)
मोनिका राजळे यांनी सर्वात प्रथम जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली, त्यावेळी त्यांनी राजळे कुटुंबाचा पारंपरिक गट सोडून दुसऱ्या गटातून उमेदवारी केली. या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. पुढे त्या जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष झाल्या. या कालावधीत त्यांनी मतदारसंघात मोठे काम केले. त्यानंतर भाजपने त्यांना २०१४ व २०१९मध्येही विधानसभेची उमेदवारी दिली. या निवडणुकांत त्यांनी विजय मिळवला. मोनिका राजळे यांनी प्रत्येक निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. तर प्रताप ढाकणे यांना प्रत्येक निवडणुकीत पराभव पहावा लागला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोनिका राजळे यांच्या विरोधात प्रताप ढाकणे यांच्यासह माजी आमदार चंद्रशेखर घुले, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य हर्षदा काकडे यांच्यासह १४ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वांकडून मोनिका राजळे यांच्या विरोधात भाषणे व आरोप सुरू आहेत. मात्र, राजळे या आरोपांना उत्तर देण्यापेक्षा मतदारसंघातील नागरिकांची कामे करण्याला विश्वास देणार असल्याचे सांगत आहेत. या राजकीय सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच लागणार आहे.