
Municipal Corporation Elections: अहिल्यानगर : महानगरपालिका निवडणुकीच्या (Municipal Corporation Elections) रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 12 (माळीवाडा) कडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. या प्रभागात भारतीय जनता पक्षाने (BJP) अत्यंत विचारपूर्वक रणनीती आखत दोन सुशिक्षित आणि कायद्याच्या क्षेत्राशी निगडीत असलेले उमेदवार शुभ्रा पुष्कर तांबोळी (Shubhra Pushkar Tamboli) आणि अमोल निस्ताने (Amol Nistane) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. या निर्णयामुळे प्रस्थापितांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली असून, ही लढाई आता ‘अनुभव विरुद्ध शिक्षण’ अशी रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अवश्य वाचा: उंबरे परिसरात रिक्षा व बसचा भीषण अपघात; तीनजण जागीच ठार
प्र.12 च्या दुरवस्थेसाठी आजवर प्रतिनिधित्व करणारे जबाबदार
अहिल्यानगर शहराची ओळख ज्या माळीवाड्यावरून होते, त्या परिसराला शहराची ‘राजधानी’ मानले जाते. सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि शैक्षणिकदृष्ट्या या भागाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, वास्तवात उपनगरांच्या तुलनेत माळीवाडा आजही विकासाच्या बाबतीत अनेक मैल मागे राहिला आहे. प्रभाग क्रमांक 12 च्या या दुरवस्थेसाठी आजवर प्रतिनिधित्व करणाऱ्या मातब्बर नेत्यांचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याची भावना जनतेमध्ये आहे.
नक्की वाचा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी अहिल्यानगरमध्ये; युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन
निधी आणण्यात अनुभवी नेते कमी पडले (Municipal Corporation Elections)
या प्रभागात गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणातील तगडे आणि मातब्बर नेते प्रतिनिधित्व करत आहेत. हे नेते अनुभवी असले तरी, त्यांच्या कार्यकाळात प्रभागातील मूलभूत समस्या सुटण्याऐवजी वाढतच गेल्याचे चित्र आहे. विशेषतः प्रभागासाठी शासनाचा मोठा निधी खेचून आणण्यात हे अनुभवी नेते कमी पडल्याचा आरोप होत आहे. याच पार्श्वभूमीवर, भाजपने शुभ्रा तांबोळी आणि अमोल निस्ताने या दोन कायद्याचे ज्ञान असलेल्या उमेदवारांना संधी दिली आहे. कायद्याचा सखोल अभ्यास असल्याने प्रशासकीय पातळीवर निधीचा पाठपुरावा कसा करावा आणि विकासकामांचा आग्रह कसा धरावा, याचे कौशल्य या दोन्ही उमेदवारांकडे आहे.
शुभ्रा तांबोळी यांच्या उमेदवारीमुळे प्रभागातील महिला वर्गामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. अहिल्यानगरची ओळख असलेल्या माळीवाड्याचा सर्वांगीण विकास करणे, हीच आमची प्राथमिकता आहे, असे शुभ्रा तांबोळी यांनी स्पष्ट केले आहे. महायुती सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेच्या धर्तीवर, आता आपल्या प्रभागाच्या विकासासाठी स्वतःची ‘लाडकी बहीण’ पुढाकार घेत असल्याने स्थानिक नागरिक या नव्या नेतृत्वाला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.
दुसरीकडे, अमोल निस्ताने यांच्या सुशिक्षित आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्वामुळे तरुणांचा कल त्यांच्याकडे झुकताना दिसत आहे. अनुभवी नेत्यांनी आजवर केवळ आश्वासने दिली, मात्र आता आम्हाला कृती करणारा आणि कायद्याच्या चौकटीत राहून हक्काचा निधी मिळवून देणारा प्रतिनिधी हवा आहे, असे सूर उमटत आहेत.
प्रभाग 12 मध्ये होणारी ही लढत ऐतिहासिक ठरणार आहे. एका बाजूला प्रस्थापितांचा अनुभव आहे, तर दुसरीकडे शुभ्रा तांबोळी आणि अमोल निस्ताने यांच्या रूपाने कायद्याची जाण असलेले नवे नेतृत्व आहे. माळीवाड्याची जनता यावेळेस परंपरेला साथ देते की परिवर्तनाचा नवा मार्ग निवडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


