Murder : नगर : जमिनीच्या वादातून स्वतःच्या भावाचा जीव घेणाऱ्या (Murder) आरोपीला नगरमधील जिल्हा व सत्र न्यायालयाने (District and Sessions Court) जन्मठेप व पाच हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास दोन महिने साध्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. दिनकर अण्णाजी गव्हाणे (वय ६५, रा. अल्हाणवाडी, ता. पाथर्डी) असे आरोपीचे नाव आहे. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील (Public Prosecutor) अनिल घोडके यांनी काम पाहिले.
अवश्य वाचा: विकासाचा झंझावात सुरू : संग्राम जगताप
जीवघेण्या हल्ल्यात मधुकर गव्हाणे यांचा मृत्यू
मधुकर व शहाबाई गव्हाणे हे दाम्पत्य अल्हणवाडी (ता. पाथर्डी) येथे राहत होते. मधुकर गव्हाणे यांचे दिनकर गव्हाणे याच्याशी वडिलोपार्जित जमिनीवरून वाद होते. या कारणावरून दिनकर गव्हाणे व त्याचा पुतण्या संतोष माणिक गव्हाणे यांनी मधुकर व शहाबाई यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यात दिनकर गव्हाणे याने केलेल्या मारहाणीत मधुकर गव्हाणे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर प्रथम शासकीय व नंतर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान मधुकर गव्हाणे यांचा मृत्यू झाला. या संदर्भात शहाबाई गव्हाणे यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. पोलिसांनी जीवघेणा हल्ला व खुनाचा गुन्हा दाखल करून घेतला.
नक्की वाचा: ‘कर्जमुक्ती योजने’साठी आधारची केवायसी गरजेची : शिवाजी कर्डिले
साक्षीदार व पुराव्यांच्या आधारे दोषी (Murder)
पाथर्डी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक पी.बी. पाटील यांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात संतोष गव्हाणे याला पुराव्या अभावी सोडण्यात आले. तर साक्षीदार व पुराव्यांच्या आधारे दिनकर गव्हाणे याला दोषी ठरवत शिक्षा सुनावण्यात आली.