Murder : नगर : सामाईक विहिरीतील पाण्याच्या वादावरून सहहिस्सेदाराचा खून (Murder) करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने (District and Sessions Court) जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. भागवत भगवान बडे (वय २८, रा. रामकृष्ण नगर, वडगाव, ता. पाथर्डी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील (Public Prosecutor) अर्जुन पवार यांनी काम पाहिले. त्यांना मूळ फिर्यादीचे वकील ॲड. योगेश सूर्यवंशी, ॲड. सचिन बडे व ॲड. संदीप शेंदूरकर यांनी सहकार्य केले.
नक्की वाचा : महापालिका कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू
मारहाण करून विहिरीत दिले फेकून
वडगाव येथे २१ डिसेंबर २०२१ रोजी शेतकऱ्यांच्या शेतीपंपासाठीचे थ्री फेजची वीज जोडणी महावितरणने वीज बिल न भरल्याने खंडित केली. शेतकऱ्यांनी बिल भरल्यानंतर महावितरणने २८ डिसेंबर २०२१ रोजी मध्यरात्री वीज पुरवठा पूर्वत केला. त्यामुळे शेताला पाणी देण्यासाठी शेतकरी जमले. यात भागवत मारुती गर्जे हे देखील त्यांच्या शेताला पाणी देण्यासाठी आले होते. गर्जे व आरोपी बडे यांची विहीर सामाईक आहे. शेताला अगोदर पाणी देण्यावरून गर्जे व बडे यांच्यात वाद झाला.
या वादानंतर काही वेळांनी गर्जे यांच्या नातेवाईक व कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ते मिळून आले नाही. तेव्हा त्यांना कळाले की परमेश्वर नावाच्या व्यक्तीला बडे याने फोन करून गर्जे यांना मारहाण करून विहिरीत फेकून दिल्याचे सांगितले आहे. त्यानुसार विहिरीत शोध घेतला असता गर्जे जखमी अवस्थेत विहिरीतील पाण्यात आढळून आले. त्यांच्या डोक्याला जखम होती. त्यांची हालचाल बंद होती. त्यामुळे भागवत गर्जे कुटुंबियांनी त्यांना तातडीने उपचारासाठी पाथर्डी येथे उपचारासाठी सरकारी दवाखान्यात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वी गर्जे यांना मृत घोषित केले.
अवश्य वाचा : आमदार थोरात यांचा “उत्कृष्ट संसदपटू” पुरस्काराने गौरव
आठ साक्षीदारांच्या साक्षी ठरल्या महत्त्वाच्या (Murder)
या प्रकरणी संजय विठ्ठल गर्जे यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.डी. कायंदे यांनी घटनेचा तपास करत न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. आरोपी व साक्षीदार यांच्या मोबाईलचे सी.डी.आर. व टॉवर लोकेशन, गुन्ह्यात वापरण्यात आलेली कुऱ्हाड, आठ साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर न्यायालयाने आरोपी भागवत बडे याला दोषी ठरवत खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप व २० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद तसेच पुरावा नष्ट करण्याच्या गुन्ह्यात तीन वर्षे सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भसल्यास दोन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.