Murder : नगर: ९० वर्षीय आजीच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीचे दागिने (Jewelry) काढून घेण्यासाठी नातवाने आजीचा गळा दाबून खून (Murder) केल्याची घटना नगर तालुक्यातील अकोळनेर (Akolner) गावच्या शिवारात उघडकीस आली. गोदाबाई लक्ष्मण जाधव (रा. माळवाडी, अकोळनेर, ता. नगर) असे मयत वृद्ध महिलेचे नाव आहे.
अवश्य वाचा: विधानसभेमुळे पोलिसांच्या सुट्ट्या,रजा २५ नोव्हेंबरपर्यंत रद्द!
दागिने चोरण्यासाठी खून
याप्रकरणी आरोपी असलेला निलेश बाळासाहेब जाधव (वय २५) याला नगर तालुका पोलिसांनी पकडले असून त्याने दागिने चोरण्यासाठी खून केल्याची कबुली दिली. अशी माहिती नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी दिली. याबाबत मयताचा मुलगा पोपट लक्ष्मण जाधव यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर घटना अकोळनेर शिवारातील भोरवाडी रोडवर असलेल्या माळवाडी येथे शनिवारी (ता.१९) सकाळी ८.१५ ते सायंकाळी घडली असून ती रविवारी (ता.२०) सकाळी ८.३० च्या सुमारास उघडकीस आली. आरोपी निलेश जाधव याने शनिवारी सकाळी आजीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिच्या कानातील व गळ्यातील सुमारे १ तोळा वजनाचे सोन्याचे दागिने काढून घेतले. आजीचा मृतदेह दिवान मध्ये लपवून ठेवला.
नक्की वाचा: भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच राजकीय बंडाळ्या सुरू
सोशल मिडीयावर आजी हरवल्याची पोस्ट टाकत बनाव (Murder)
सायंकाळी सोशल मिडीयावर पोस्ट टाकली की आजी हरवली आहे. कोणाला दिसल्यास संपर्क करावा व पोस्टमध्ये फोटोखाली संपर्कासाठी त्याचा तसेच कुटुंबातील आणखी दोघांचे मोबाईल नंबर दिले. त्याने रचलेल्या बनावामुळे जाधव कुटुंबातील सदस्यांनी आजीचा परिसरात बऱ्याच ठिकाणी शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. रविवारी सकाळी फिर्यादी पोपट जाधव यांना मृतदेह लपवून ठेवलेल्या दिवानमधून मुंग्या निघत असल्याचे दिसले. त्यांनी मुंग्या कोठून निघतात हे पाहण्यासाठी दिवाण वरील प्लायवूड चे झाकण उघडले असता त्यांना त्यात गोदाबाई यांचा मृतदेह दिसून आला. त्यांनी कुटुंबातील सदस्यांना माहिती देत पोलिसांना फोन केला.
ही माहिती मिळताच नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक संपतराव भोसले, प्रल्हाद गिते, उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे आदींनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. जाधव कुटुंबियांकडे विचारपूस केल्यावर त्यांनी आरोपी निलेश जाधववर संशय व्यक्त केला. पोलिसांनी तातडीने हालचाली करत फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला पकडले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने दागिन्यांसाठी आजीचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. दुपारी पोपट जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी निलेश जाधव याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करत त्यास अटक केली. पुढील तपास प्रल्हाद गिते करत आहेत.