Murder : नगर : राज्यामध्ये गाजलेल्या राहुरी तालुक्यातील वकील दाम्पत्याच्या हत्या प्रकरणाची (Lawyer Couple Murder Case) सुनावणी आज अहिल्यानगर येथील न्यायालयामध्ये सुरू झाली. सरकारी पक्षातर्फे या घटनेतील माफीच्या साक्षीदाराची आज न्यायालयासमोर तपासणी झाली व त्याने या हत्याकांडाचा (Murder) घटनाक्रम मुख्य जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या समोर मांडला. त्याने सांगितलेल्या घटनाक्रमामुळे सर्वांनाच धक्का बसला. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्वल निकम (Adv. Ujjwal Nikam) यांनी त्याची तपासणी घेतली. सलग दोन दिवस या घटनेची सुनावणी सुरू राहणार आहे.
नक्की वाचा : लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार की नाही?आदिती तटकरेंच महत्वाचं विधान
विहिरीत आढळला होता पती – पत्नीचा मृतदेह
राहुरी न्यायालयात वकिली व्यवसाय करणारे आढाव दाम्पत्यांचा खून झाला. या दोघा पती – पत्नीचा मृतदेह उंबरे (ता. राहुरी) येथील स्मशानभुमीतील विहिरीत आढळला होता. ॲड. राजाराम जयवंत आढाव व ॲड. मनिषा आढाव असे या दाम्पत्याचे नाव आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे हर्षल दत्तात्रय ढोकणे हा माफीचा साक्षीदार आहे. आरोपींमध्ये किरण नानाभाऊ दुशिंग, सागर साहेबराव खांदे, शुभम महाडिक, बबन सुनील मोरे यांचा समावेश आहे.
अवश्य वाचा : राज्यात थंडीचा पारा वाढणार; पंजाबराव डख यांचा अंदाज
हर्षल ढोकणे बनला माफीचा साक्षीदार (Murder)
या हत्याकांड प्रकरणांमध्ये आरोपी हर्षल ढोकणे याने सरकारी पक्षाला सर्व माहिती आपण देण्यास तयार आहोत, असे सांगितल्यानंतर त्याला आज न्यायालयासमोर हजर केले. हर्षलने यावेळी त्याने न्यायालयासमोर सर्व हत्याकांडाचा पहिल्यापासूनचा घटनाक्रम मांडला. यामध्ये त्यांनी आपण एस. वाय. बीकॉम ला शिक्षण घेत असून आपलं मूळ गाव उंबरे असल्याचे त्यांनी सांगितले. त्याने आपली ओळख बबन मोरे यांच्याशी झाली व आपण त्यांना ओळखत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या घटनेतील चारही इतर आरोपींना आपण ओळखत आहोत असे म्हणत त्यांनी त्यांची गावाची ठिकाणे व नावे यावेळी न्यायालयासमोर सांगितले.
यावेळी हर्षल ढोकणे हा प्रसाद शुगर साखर कारखान्यात ऊस काट्यावर गुन्हा घडण्याच्या तीन महिने अगोदरपासून नोकरी करत असल्याचे त्याने सांगितले. २४ जानेवारी २०२४ रोजी बबन मोरे यांचा मला फोन आला की “उद्या आपल्याला गेम करायचा आहे. तू रॉयल पॅलेस या ठिकाणी ये”, असे सांगितले. त्याचा आपल्याला फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. मी परत बबनला फोन केला तेव्हा बबन याने तू ये आपल्याला सर्वांना एक गेम करायचा आहे. त्यात तुला पण पैसे मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले. त्याने नंतर हा फोन शुभम महाडिक याला दिला. ठरलेल्या ठिकाणी आल्यावर शुभमने वकिलांना फोन लावण्यास सांगितले. व म्हणाला पाथर्डी कोर्टात जामिनासाठी जायचे आहे. त्यानंतर आम्ही पाच जण गाडीमध्ये बसलो. आम्हाला मोबाईल बंद करण्यास सांगितले. नंतर आम्ही सर्वजण राहुरी न्यायालयासमोर आलो. त्यानंतर किरण व शुभम हे वकिलांना आणण्यासाठी गेले. वकील आल्यानंतर त्यांना कारमध्ये पुढे बसवले व आम्ही चार जण मागे बसलो. त्यानंतर आम्ही निघत असताना किरण कार चालवत होता. ब्राह्मणीच्या अलीकडे एका हॉटेलच्या जवळ निर्जण स्थळी त्यांना घेऊन गेलो. त्यानंतर वकील हे कारमध्ये बसले असताना किरण याने त्यांचे हातपाय दोरीने बांधायला सुरुवात केली. त्यांनी याला विरोध केला. त्यावेळी किरण याने वकिलाला मारहाण केली.
यावेळी किरण याने वकिलांना सांगितले की तुमचा मुलगा साई याने आळेफाटा या ठिकाणी मुलीला पळवून आणले आहे. हे प्रकरण मिटवायचे असेल तर १० लाख रुपये द्या. वकील यांनी मी मुलाला बोलतो, असे ते म्हणाले. त्यानंतर किरण याने त्यांना सांगितले की, तुमच्या पत्नीला बोलावून घ्या. तिला मोहटादेवीला जायचं आहे, असे सांगा. त्यानंतर वकिलाच्या फोन वरून त्यांच्या पत्नीला फोन वरून शुभम तुला घ्यायला येईल असे सांगितले. त्यावरून आम्ही सर्वजण पुन्हा एका हॉटेलमध्ये गेलो. त्यानंतर एक जण राहुरी येथील न्यायालयात त्यांना आणायला गेला. त्यांना घेऊन येत असताना आम्ही पुन्हा ब्राह्मणी जवळ एक निर्जण स्थळी आलो. त्यानंतर कारमध्ये त्यांना त्यांचे पती बांधून ठेवल्याचे दिसले व त्यांनी त्या वेळेला कारमध्ये बसण्यास नकार दिला. त्यावेळेला किरण याने त्यांना ढकलून कारमध्ये बसविले. मात्र, त्यांच्याकडे हात बांधण्यासाठी काही नसल्याने त्यातील एकाने रुमाल आणून दिला. कोणता रुमाल होता, त्याची ओळख तुम्हाला आहे का? असे वकील उज्वल निकम यांनी त्याला विचारले. व न्यायालयासमोर तो सीलबंद केलेला रुमाल यावेळी दाखवण्यात आला व तो त्याने ओळखला. यावेळी ढोकणे याने आम्ही ज्या वेळेला कारमध्ये होतो. त्या वेळेला किरण याने राजाराम आढाव व मनीषा आढाव तुम्हीच ना, असे त्यांना विचारले. त्यावर त्यांने होकार दिला. तुमचा मुलगा साई आहे ना असे त्यांना विचारले.
त्यानंतर ते वकिलाच्या बंगल्यावर जाण्यास निघाले. त्यापूर्वी एकजण वकिलाच्या बंगल्याजवळ गेला. तिथे वकिलाचा कामगार होता. वकिलाला फोन करून कामगारास जाण्यास सांगण्यात आले. परंतु कामगार तिथेच होता. संशयित आरोपीचा पुन्हा वकिलाला फोन आला की तुमचा कामगार अजून तिथेच आहे त्याला जाण्यास सांगा. त्यानंतर वकिलाने पुन्हा फोन करून कामगारास जाण्यास सांगितले. यानंतर वकील दाम्पत्याला घेऊन आरोपी त्यांच्या बंगल्यावर घेऊन गेले. असे माफीचा साक्षीदार असलेला संशयित आरोपी हर्षल ढोकणे याने सांगितले. मात्र ढोकणे याला चक्कर आल्याने न्यायालयाचे कामकाज तहकूब करण्यात आले. पुढील सुनावणी मंगळवार (ता.१०) रोजी होणार आहे. यावेळी मुख्य आरोपींतर्फे नाशिकचे वकील सतीश वाणी हे बाजू मांडत असून वकील वैभव बागुल, वकील जर्जरी शेख, वकील कश्यप तरकसे हे इतर आरोपींतर्फे काम पाहत आहे.
वकिलांची झाली शाब्दिक चकमक (Murder)
सरकारी पक्षाचे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी सरकारी साक्षीदार हर्षल ढोकणे याला प्रश्न विचारताना आरोपीच्या वकिलांनी त्याला आक्षेप घेतला. तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न त्याला विचारू नका. तुम्ही एक प्रकारे स्टोरी तयार करून आणलेली आहे, असा आक्षेपही त्यांनी घेतला. न्यायालयाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे त्यांना विचारा, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी पुन्हा आक्षेप घेत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दाखला यावेळी देऊन कशा पद्धतीने साक्षी घ्यायची याची निर्देश दिलेले आहेत, असे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. व त्यापुढे न्यायालयाने निकम यांना नियमितपणे आपण विचारू शकता, असे सांगितले.
…आणि त्याला आली चक्कर
यामध्ये सरकारी पक्षाचा साक्षीदार हर्षल ढोकणे हा माहिती सांगत असताना त्याला अचानकपणे न्यायालयाच्या आवारातच माहिती सांगताना चक्कर आली. तो त्या ठिकाणी खाली बसला. त्यानंतर न्यायालयाने काही काळ कामकाज तहकूब केले.
अधिकाऱ्यांना विचारला जाब
राहुरी येथील वकील दांपत्याचा खून प्रकरणांमध्ये आज येथील जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी सुरू झाली. सुरुवातीला आरोपींना न्यायालयामध्ये हजर केले असता आरोपींनी आम्हाला नाशिक जेलमध्ये होतो. तिथे आम्हाला पाच दिवस खाण्यास दिले नव्हते, असे ढोकणेने सांगितले. यावर न्यायालयाने याची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला. यावेळी त्यांच्यासमवेत असलेल्या अधिकाऱ्यांनी आम्ही त्यांना राहुरी या ठिकाणी नाष्टा करण्यासाठी सांगितले होते. मात्र, त्यांनी त्यास नकार दिला. न्यायालयाने दुपारी त्यांची जेवणाची व्यवस्था करा, अशा प्रकारचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.