Murder : नगर : राज्यात गाजलेल्या नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वकील दाम्पत्य खून (Lawyer Couple Murder Case) प्रकरणाची सुनावणी नगर येथील न्यायालयामध्ये (Court) सुरू आहे. सरकारी पक्षातर्फे या घटनेतील माफीच्या साक्षीदाराची आज पुन्हा न्यायालयासमोर तपासणी झाली. या हत्याकांडाचा (Murder) घटनाक्रम पुढे सांगून वकील दाम्पत्याचे हात-पाय बांधून तसेच शरीराला दगड बांधून विहिरीत टाकून दिले, असा कबुली जबाब माफीचा साक्षीदार आरोपी हर्षल ढोकणे याने प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे याच्या समोर आज (ता. १०) नोंदविला.
नक्की वाचा : विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉनचे अहिल्यानगरला स्वागत
हर्षल ढोकणेची घेतली उलट तपासणी
सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी हर्षल ढोकणेची तपासणी घेतली. तर आरोपींंचे वकील सतीश वाणी यांनी दुपारनंतर हर्षल ढोकणेची उलट तपासणी घेतली. दरम्यान, माफीच्या साक्षीदार ढोकणे उलट तपासणी आज सुरू झाली. त्यामध्ये अनेक प्रश्न त्याला वकिलांनी विचारले.राहुरी न्यायालयात वकिली व्यवसाय करणारे आढाव या दाम्पत्यांचा खून झाला होता. या दाम्पत्याचे मृतदेह उंबरे (ता. राहुरी) येथील स्मशानभूमीतील विहिरीत आढळले होते. ॲड. राजाराम जयवंत आढाव (वय ५२) व ॲड. मनीषा आढाव (वय ४२) असे या दाम्पत्याचे नाव आहे. या प्रकरणात सरकारी साक्षीदार हर्षल दत्तात्रय ढोकणे हा आरोपी आणि माफीचा साक्षीदार आहे. या प्रकरणात किरण नानाभाऊ दुशिंग, सागर साहेबराव खांदे, शुभम महाडिक, बबन सुनील मोरे हे आरोपी आहेत.
अवश्य वाचा : कुर्ल्यात बेस्ट बसने अनेकांना चिरडलं; ७ मृत्यू तर ४८ जण जखमी
शिवीगाळ करत धमकावत पैसे घेतले (Murder)
या हत्याकांड प्रकरणांमध्ये आरोपी हर्षल ढोकणे याला सोमवारी (ता. ९) रोजी साक्ष सुरू असताना त्रास झाला होता. मंगळवारी (ता.१०) रोजी त्याची पुन्हा सरतापासणी सुरू झाली. वकील उज्ज्वल निकम यांनी त्याला अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यावेळी संशयित आरोपी ढोकणे याने वकिलांना सांगितले की, आम्ही त्यांच्या घरात नेल्यानंतर दुपारच्या सुमाराला त्यांच्या मोबाईलवर एक फोन आला. त्यानंतर किरण दुशिंग याने वकिलांना नीट बोला, असा दम दिला. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी या दोघांना पहिल्या मजल्यावर नेले. तिथे किरणने वकील राजाराम आढाव यांच्याकडे पैशाची मागणी केली. यावेळी वकील आढाव यांनी तुम्ही मला अगोदर फिर्याद दाखवा, असे त्यांना सांगितले. यानंतर किरण हा बाहेर निघून गेला. आम्ही सर्वजण या दोघांसोबत थांबलो होतो. त्याच वेळेला त्यांच्या पत्नी मनीषा आढाव यांनी आम्हाला “तुम्ही आम्हाला यांच्या तावडीतून सोडवा, मी तुम्हाला पैसे देईल,” असे सांगितले. मात्र, हेच बोलणे किरण याने ऐकले नंतर किरणने आम्हाला शिवीगाळ करत धमकावत पैसे घेतले, तर याद राखा, असे तो आम्हाला म्हणाला. परत आम्ही या वकील पती-पत्नीचे हात बांधले व तोंड सुद्धा आम्ही बांधले, असे हर्षल याने यावेळी सांगितले.
त्यानंतर आम्ही या दोघांना घेऊन वकिलांच्या पांढऱ्या कारमधून ब्राह्मणीच्या बाजूला असलेल्या कॅनलच्या दिशेने गेलो. त्यावेळी हर्षल याने घरी फोन कारण्यासाठी चालू केला असता माझा मित्र शुभम गायकवाड याचा मला फोन आला. व त्याने मला तू दिवसभर कुठे आहे. तुझा फोन बंद लागत होता, असे विचारण्यात आले. मी कारखान्यांमध्ये काम करत होतो, असे सांगितले व फोन बंद केला. नंतर घरी फोन लावला. मी कारखान्यामध्येच दुसऱ्या शिफ्टला थांबणार आहे, असे हर्षल याने आपण घरी सांगितले. त्यानंतर आम्ही फोन बंद करून वांबोरी येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानाच्या बाजूला आम्ही कार घेऊन या दोघांना घेऊन गेलो. त्या ठिकाणी आरोपी किरण दुशिंग याने पुन्हा पैशाची मागणी केली. तुम्ही आम्हाला किती पैसे देणार, अशी विचारणा केली. त्यावेळी वकील आढाव यांनी माझ्यावर कर्ज झाले आहे. पैसे मॅडमच्या खात्यामध्ये आहेत. ते सुद्धा ६० ते ६५ हजार रुपये असतील, असे त्यांनी सांगितले. त्यावेळेला आम्ही त्यांचा मोबाईल तपासला असता त्यांच्या मोबाईल मध्ये दोन ते तीन खाते दिसून आले. त्यामध्ये मनीषा आढाव यांच्या वडिलांचे सुद्धा खाते त्यामध्ये दिसून आले. त्यानंतर त्यांच्या वडिलांच्या खात्यामध्ये असलेले पैसे वकील साहेबांच्या खात्यात टाकण्यास सांगितले. त्यानंतर त्याच्यकडून एटीएमकार्ड घेतले व पासवर्ड विचारल्याचे सांगितले. यावर विशेष सरकारी वकील उज्वल निकमांनी त्याला एसबीआयचे एटीएम कार्ड होते ते कार्ड तू ओळखतो का? अशी विचारणा केली. यावर त्याने हो असे सांगितल्यावर न्यायालयासमोर हे कार्ड दाखवण्यात आले होते त्याने ते एटीएम कार्ड ओळखले.
यानंतर या वकिलांना दोघांना बांधून पुन्हा ब्राह्मणी या ठिकाणी परत आणले व पैशाचा तगादा लावला. जर पैसे दिले नाहीत तर आम्ही अत्याचार करू, अशी धमकी सुद्धा वकील पत्नीला आरोपींनी दिली. त्यानंतर वकील पत्नीच्या हातामध्ये असलेले सोन्याचे ब्रेसलेट ही काढून घेण्यात आले. त्यानंतर किरण दुशिंग याने शुभम महाडिक, सागर खांडे व हर्षलने मिळून त्यांचे पुन्हा तोंड बांधले. त्यानंतर शुभम कडून किरण याने प्लास्टिकची पिशवी घेऊन यायला सांगितले. त्यानंतर पती-पत्नीच्या तोंडात रुमाल बांधून त्यांच्या डोक्यात पिशवी घालून त्यांना चिकटपट्टी लावण्यात आली. गळ्यापर्यंत त्यांना प्लास्टिकची पिशवी ही घालण्यात आली, त्याच वेळी मनीषा आढाव यांनी माझ्या बाबाना मारले, आता मला मारून टाका, असे म्हणल्यावर बबन मोरे, सागर खांदे याने तशीच पिशवी मनीषा आढावच्या डोक्यामध्ये घातली. ती पिशवी मनीषा आढावने चावली त्यानंतर त्यांना आरोपींनी मारहाण केली. त्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या. आरोपी मुख्य रस्त्याच्या दिशेने निघाले असता किरणने दगड गोळा करून कारमध्ये टाकण्यास सांगितले. त्यानंतर सागर व हर्षल याने ते काम केले. त्यावेळी आढाव दाम्पत्य बेशुद्ध होते. दुसरीकडे किरणने वकिलांचा मोबाईल फोडला व शेजारी असलेल्या झाडांमध्ये फेकून दिला. यानंतर आरोपींनी एका हॉटेलमधून दोन गोण्या घेतल्या. तेथून त्यांनी कुक्कडवेढे रस्त्याला बिरोबा मंदिराच्या पाठीमागे कार थांबवली. त्यावेळी किरण दुशिंगने गोण्यांमध्ये उर्वरित आरोपींना दगड टाकण्यात सांगितले. आम्ही दगड गोण्यामध्ये भरल्यानंतर त्या ठिकाणी मनीषा आढाव यांचा मोबाईल नाल्यामध्ये टाकून दिला. बबन मोरे यांच्या घरापाशी आल्यानंतर तेथून त्यांनी दोन साड्या घेतल्या. आरोपी उंबरे गावच्या स्मशानभूमी जवळील विहिरीजवळ गेले. त्यांनी विहिरीजवळ दगडाने भरलेल्या गोण्या आणून ठेवल्या. त्यानंतर आरोपींनी वकील दाम्पत्याचे ओढणीने व साडीने हात-पाय बांधून त्यांच्या शरीराला ओढणीने दगड बांधले. तसेच आरोपींनी वकील दाम्पत्याला विहिरीत फेकले. आरोपींनी वकील दाम्पत्याची कार राहुरी न्यायालयासमोर उभी केली. मात्र, तेथे पोलीस आल्याने आरोपींनी तेथून पळ काढला.
मला पश्चाताप झाल्याने दिला कबुली जबाब
केलेल्या हत्याकांडाचा पश्चाताप मला झाला, त्याच वेळेला मी माझ्या मित्राला ही सगळी बाब सांगितली, व मला आता कबुली जवाब द्यायचा आहे, असा मी निश्चय केला व त्यानंतर मी विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांचा समोर माझा कबूली जवाब दिला असल्याचे हर्षल याने न्यायालयाला सांगितले. त्याला न्यायालयाने हा जवाब दाखवल्यावर हा जबाब मी दिला असून ही माझी स्वाक्षरी असल्याचे त्यांनी कबूल केले.
लाखांची डील मात्र, मिळाले दहा हजार
वकील दाम्पत्याची हत्या केल्यानंतर आम्हाला चार ते पाच लाख रुपये मिळणार होते. मात्र, आम्हाला किरण याने फक्त १० हजार रुपये प्रत्येकी दिले असल्याचे आरोपी हर्षल याने आपल्या जबाबात सांगितले. मला केलेल्या घटनेचा पश्चाताप झालेला होता, त्यामुळे मी मला मिळालेले पैसे हे जाळून टाकले, असेही त्याने आज न्यायालयासमोर सांगितले.
दोन्ही वकिलांमध्ये शाब्दिक चकमक
न्यायालय मध्ये युक्तिवाद सुरू असताना वकील उज्वल निकम यांनी काही प्रश्न विचारल्यानंतर आरोपीचे वकील सतीश वाणी यांनी त्यांना अटकाव केला. त्या वेळेला दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. निकम यांनी मला अधिकार आहे, असे सांगितले. त्यानंतर उलट तपासणीच्या वेळी वाणी हे आरोपीला प्रश्न विचारताना निकम उत्तर द्यायला लागल्यावर यावेळी त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले व पुन्हा या दोघांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.