Murder : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील अरणगाव येथील मिठू कार्तिक दत्त (वय ४२) यांच्या मारहाणीतून झालेल्या मृत्यूनंतर खुनाचा (Murder) गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याच्या आरोपावरून तपास अधिकारी तथा अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांची राहरी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. तोफखाना पोलीस ठाण्यातील (Tofkhana Police Station) सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारूळे यांच्याकडे तालुका पोलीस ठाण्याचा (Ahilyanagar Taluka Police Station) प्रभारी पदभार देण्यात आला आहे.
नक्की वाचा: अजित पवारांच्या खात्याच्या अधिकाऱ्यांकडून निधनाच्या दिवशीच सह्यांचा सपाटा; मुख्यमंत्र्यांना दिली स्थगिती
पोलीस अधीक्षक घार्गे यांनी घेतली तत्काळ दखल
६ मार्च २०२५ रोजी मिठू दत्त यांना निघृण मारहाण करण्यात आली. सुरूवातीला त्यांना अहिल्यानगरमधील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुणे येथे हलविण्यात आले. २३ मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. तथापि, २९ मार्च रोजी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात केवळ ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली. पुढील तपास स्वतः सहायक पोलीस निरीक्षक गीते यांनी हाताळला; मात्र खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तक्रार झाल्यानंतर अधीक्षक घार्गे यांनी तत्काळ दखल घेत सुपा पोलीस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी यांच्याकडे चौकशी सोपविली.
गीते यांच्या भूमिकेबाबत गंभीर संशय (Murder)
गडकरी यांच्या तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या. मिठू दत्त यांचा मृत्यू अपघाती नसून मारहाणीमुळे झालेला खून असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पाच जणांविरूध्द खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीपासून खुनाचा गुन्हा का दाखल करण्यात आला नाही? घटनेचे व्हिडिओ पुरावे असतानाही प्रकरण ‘अकस्मात मृत्यू’ म्हणून का ठेवण्यात आले? आरोपींशी आर्थिक तडजोड झाली का? तपासात जाणीवपूर्वक विलंब करण्यात आला? या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. मात्र, गडकरी यांच्या तपासामुळे गीते यांच्या भूमिकेबाबत गंभीर संशय निर्माण झाला आहे. मात्र अधीक्षक घार्गे यांनी गिते यांची बदली राहुरी पोलीस ठाण्यात केली आहे. खातेनिहाय चौकशी पूर्ण झाल्यानंतर उपअधीक्षक वमने हे अधीक्षक घार्गे यांना अहवाल सादर करतील आणि त्यानंतर पुढील कारवाई अपेक्षित आहे.
हे देखील वाचा : मालेगावमध्ये पुन्हा पेटला टिपू सुलतान वाद; पुन्हा फोटो लावणार असल्याचं उपमहापौरांचं वक्तव्य
दरम्यान, अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याचा प्रभारी सहाय्यक निरीक्षक गणेश वारूळे यांच्याकडे सोपविण्यात आला असून तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे. खमक्या अधिकारी म्हणून ओळख असलेले वारूळे तालुक्यात कायदा सुव्यवस्थेची घडी बसवतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



