Murder | संशयी स्वभावातून पतीने केला पत्नीचा खून; गोपाळपूर येथील घटना

अमानुष मारहाणीमुळे झालेल्या गंभीर दुखापतींमुळे मृत्यू

0

Murder | नेवासा: संशयी स्वभावातून पतीने आपल्या पत्नीला टणक हत्याराने अमानुष मारहाण करून तिचा खून (Murder) केल्याची घटना नेवासा तालुक्यातील गोपाळपूर येथे घडली आहे. याप्रकरणी नेवासा पोलिसांत पती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून आरोपी पतीस अटक करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिली.  संतोष संभाजी वडागळे (रा. गोपाळपूर, ता. नेवासा) असे आरोपीचे नाव आहे. 

अवश्य वाचा- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना; आरोपी जेरबंद

अमानुष मारहाणीमुळे झालेल्या गंभीर दुखापतींमुळे मृत्यू (Murder)

याबाबत माहिती अशी की, मयत महिलेचा विवाह संतोष याच्याशी झाला होता. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच संतोषचा रागीट आणि संशयी स्वभाव समोर आला. तो वारंवार किरकोळ कारणावरून पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास देत असे. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास आरोपीने पत्नीला अत्यंत क्रूरपणे मारहाण केली. त्यानंतर स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी बनाव रचत तिला संशयास्पदरित्या नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालय दाखल केले. मात्र, महिलेच्या अंगावरील गंभीर जखमा पाहून संबंधित वैद्यकीय अधिकारी यांचा संशय बळावला. महिलेचा मृत्यू नैसर्गिक नसून घातपात असल्याचे प्राथमिक दर्शनी दिसत होते. अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले की, महिलेचा मृत्यू टणक वस्तूने केलेल्या अमानुष मारहाणीमुळे झालेल्या गंभीर दुखापतींमुळे झाला आहे. या अहवालाने पतीचा बनाव उघड पाडला. 

नक्की वाचा- डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, 10 दिवसांत अण्वस्त्र करार झाला नाही तर…

आरोपी जेरबंद (Murder)

आपल्या बहिणीचा छळ करून तिचा खून केल्याची खात्री पटल्यानंतर, मयत महिलेचा भाऊ अजित उत्तम शिंदे (वय २७) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपी संतोष वडागळे याला अटक केली आहे.