Nagar Urban Bank : नगर : नगर अर्बन बँकेच्या (Nagar Urban Bank) संचालकांनी ठेवीदारांचे हक्काचे पैसे त्वरित द्यावेत. या लुटारूंवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी करत नगर अर्बन बँकेत पैसे अडकलेल्या ठेवीदारांनी बँक बचाव समितीच्या नेतृत्वाखाली आज (बुधवारी) माजी खासदार स्व. दिलीप गांधी (Dilip Gandhi) यांच्या घर, नगर अर्बन बँक व पोलीस अधीक्षक कार्यालयावर आसूड मोर्चा काढला. तसेच पोलीस प्रशासनाला मागणीचे निवेदन दिले. घरासमोर मोर्चा आल्यानंतर माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी (Suvendra Gandhi) मोर्चाला सामोरे गेले. यावेळी त्यांनी ठेवीदारांना आश्वस्त केले.
हे देखील वाचा : दिवाळी फराळ आणि राजकीय गुऱ्हाळ
यावेळी आंदोलनकर्त्यांना माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी सांगितले की, ठेवीदारांना ठेवी परत मिळाव्यात व बँक पुन्हा सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. थकीत वसुलीसाठी आमचे प्रयत्न सुरू असतानाच रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केला. त्यामुळे अडचण झाली, अशी भूमिका त्यांनी मांडली. ठेवीदारांनी मात्र, त्यांना कठोर शब्दात सुनावले. आम्हाला आमच्या ठेवी व खात्यात अडकलेले पैसे पाहिजेत. बँक सुरू होणार अथवा नाही, हे सांगू नका. आम्ही दोन वर्षे तुमचे ऐकले. आता आम्ही किती दिवस थांबायचे, असा सवाल करत ठेवीदारांनी आक्रमक भूमिका घेतली. घोषणाबाजी झाल्यानंतर मोर्चा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे रवाना झाला. पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून घोषणाबाजी करण्यात आली. ठेवीदारांनी स्वतःवर आसूड ओढत आंदोलन केले.
नक्की वाचा : जिल्हा परिषदेच्या शाळेला मिळाले संगणक भेट
यावेळी उद्योजक राजेंद्र चोपडा, राजेंद्र गांधी, मनोज गुंदेचा, संजय झिंजे, नाना देशमुख ,अच्युतराव पिंगळे, महेश जेवरे, गंगाधर पावसारे, सुमन जाधव, उषा कोतकर, सूर्यकांत सोनूकेवळ आदींसह जवळपास १०० ठेवीदार उपस्थित होते.