नगर : भारतीय रिझर्व्ह बँके (Reserve Bank of India) ने नगर अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेचा (Nagar Urban Bank) परवाना रद्द करण्याचा निर्णय बुधवार (ता. ४) राेजी घेतला आहे. आरबीआयने बँकेला बँकिंग व्यवसाय बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु, बँकेवर विश्वास ठेवून बँकेमध्ये ठेवलेल्या ठेवी या सुरक्षित आहे. केंद्रीय निबंधक (Central Registrar) यांच्याकडून पुढील आदेश पारित झाल्यावर ठेवीदारांना पैसे देण्याची प्रक्रिया सुरू हाेणार आहे, तरी ठेवीदारांनी काेणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन बँक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नगर अर्बन बँकेचे एक लाखापेक्षा जास्त सभासद असून बँकेच्या ३६ शाखा आहेत. तसेच बँकेच्या एकूण ३२२.५९ कोटीच्या ठेवी आहेत. ज्या ठेवीदारांच्या ठेवी बँकेकडे ठेवल्या आहेत. त्यांच्या ठेवी सुरक्षित आहे. दिल्लीतील केंद्रीय निंबधक कार्यालयाकडून पुढील आदेश आल्यानंतर ठेवीदारांना ठेवी परत दिल्या जाणार आहे. त्यामुळे ठेवीदारांनी अजिबात घाबरुन जाण्याची गरज नाही. ठेवीदारांना ठेवीविषयी काही शंका असेल, तर त्यांनी बँकेच्या शाखा कार्यालयात संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.