Nagar Urban Co-operative Bank : नगर : रिझर्व बँकेने नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा (Nagar Urban Co-operative Bank) बँकिंग परवाना रद्द केल्यानंतर केंद्र शासनाने (Central Govt) बँकेवर नोव्हेंबर २०२३ मध्ये अवसायक म्हणून एनसीडीसीचे उपसंचालक गणेश गायकवाड यांची नियुक्ती केली होती. दरम्यानच्या आठ महिन्यांच्या कालावधीमध्ये २० जुलै अखेर बँकेच्या एकुण कर्जापैकी रुपये ३० कोटी ८६ लाख वसूल करण्यात आले आहेत. थकीत कर्ज वसुलीला आणखी गतिमान करण्यासाठी बँक प्रशासनाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार एकरकमी कर्ज परतफेड योजना ५ जूनपासून सुरू केली आहे.
अवश्य वाचा: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कर्मचाऱ्यांना आरएसएसमध्ये जाण्यावर बंदी नाही
योजनेत सहभागी होण्यासाठी २३९ अर्ज प्राप्त
या योजनेस थकीत कर्जदारांचा प्रतिसाद मिळत आहे. ओटीएस योजनेत सहभागी होण्यासाठी एका महिन्यात २३९ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी १४ कर्जदारांनी आतापर्यंत १०० टक्के रक्कम रुपये ३ कोटी ८९ लाख २९ हजार रुपये भरले आहेत. ५ कर्जदारांनी ओटीएसमध्ये ठरलेल्या अंतिम रकमेच्या २५ टक्के रक्कम रुपये ६ लाख ८७ हजार रुपये भरली आहे. उर्वरित रक्कम देखील लवकरच ठरल्याप्रमाणे जमा होणार आहेत. त्याचबरोबर डीआयसीजीसीच्या तिसऱ्या क्लेमच्या माध्यमातून १७ हजार ४२४ ठेवीदारांना ६३.१५ कोटी लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती एनसीडीसीचे संचालक तथा बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी दिली.
नक्की वाचा: ‘ओबीसी आरक्षणावर शरद पवार मूग गिळून गप्प बसलेत’ – लक्ष्मण हाके
थकीत कर्ज वसुलीची प्रक्रिया सुरू (Nagar Urban Co-operative Bank )
न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच पोलीस प्रशासनामार्फत देखील थकीत कर्ज वसुलीची प्रक्रिया सुरू आहे. सर्व थकीत कर्जदारांनी या एक रकमी परतफेड (ओटीएस) योजनेचा लाभ घेऊन संभाव्य कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी आपली थकबाकीची रक्कम लवकरात लवकर भरून बँक प्रशासनास सहकार्य करावे, तसेच सर्व खातेदार व ठेवीदार यांनी आपापले केवायसी कागदपत्र नजीकच्या शाखेत जमा करून ठेवी परत मिळवण्यासाठी क्लेम फॉर्म देखील लवकरात लवकर भरून द्यावेत, असे आवाहन अवसायक गायकवाड यांनी केले आहे. थकीत कर्जाची वसुली करून ठेवीदारांना त्यांचे कष्टाचे पैसे परत करण्यासाठी बँक प्रशासन प्रयत्नशील असल्याचे देखील यावेळी गायकवाड यांनी सांगितले.