नगर : महाराष्ट्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुरुषोत्तम करंडक (Purushottam karandak) आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत नगरचा डंका पुन्हा वाजला आहे. या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचे सांघिक पारितोषिक असलेला संजीव करंडक नगरच्या न्यू आर्टस सायन्स अॅण्ड कॉमर्स कॉलेजच्या ‘देखावा’ (Dekhava) या एकांकिकेला मिळाले आहे. या स्पर्धेचा निकाल काल (रविवारी) जाहीर करण्यात आला. या करंडक स्पर्धेत नगरमधील न्यू आर्ट्स कॉलेजच्या ‘देखावा’ व पेमराज सारडा महाविद्यालयातील ‘अय’ (Ay) या एकांकिकेला पारितोषिक मिळाले.
नक्की वाचा : अखेर आमदार अपात्रता प्रकरणाला मुहूर्त;’या’दिवशी होणार सुनावणी
गरवारे महाविद्यालयाच्या एकांकिकेने पटकावला ‘पुरुषोत्तम करंडक’ (Purushottam Karandak)
महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित ५९ वी आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा पुण्यातील भरतनाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील यंदाचा ‘पुरुषोत्तम करंडक’ पुण्यातील गरवारे महाविद्यालयाच्या बस नंबर १५३२ या एकांकिकेने पटकावला. नगरच्या न्यू आर्टस महाविद्यालयाच्या ‘देखावा’ एकांकिकेला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी प्रायोजिक लेखकाचे पारितोषिक पवन पोटे याला, अभिनयाचे उत्तेजनार्थ पारितोषिक राखी गोरखा हिला, उत्तेजनार्थ दिग्दर्शक पारितोषिक ऋषिकेश सकट याला, सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय नैपुण्य पारितोषिक पवन पोटे याला मिळाले आहे. नगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयाच्या ‘अय’ या एकांकिकेला भगीरथ करंडक मिळाला आहे.
अवश्य वाचा : ‘काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा करु नये’- संजय राऊत
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतील सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठी असलेले जयराम हर्डीकर स्मृतिचिन्ह व ५००१ रुपयांचे पारितोषिक मएसोचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड करिअर कोर्सेसे (आयएमसीसी) सादर केलेल्या ‘सखा’ या एकांकिकेने पटकाविले. तर या स्पर्धेतील सांघिक द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक हरी विनायक करंडक आणि ३००१ रुपयांचे रोख पारितोषिक विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बारामतीच्या ‘पाटी’ एकांकिकेने पटकावले आहे.
ज्येष्ठ नाटककार चंद्रकांत देशपांडे यांच्या हस्ते स्पर्धेचे पारितोषिक वितरण (Purushottam Karandak)
पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी शनिवार (ता.२१) आणि रविवारी (ता.२२) भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली होती. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, दि.२८ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता भरत नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ नाटककार चंद्रकांत प्रभाकर देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे. पुरुषोत्तम बेर्डे, शुभांगी गोखले, गिरीष परदेशी यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.