Nagpur Legislative Assembly Building : नगर : नागपूर विधिमंडळ वास्तूच्या (Nagpur Legislative Assembly Building) विस्तारांतर्गत प्रस्तावित नवीन इमारतीचे बांधकाम व आवश्यक जमिनीच्या अधिग्रहणासंदर्भात आज विधानभवन, मुंबई (Vidhan Bhavan Mumbai) येथे महाराष्ट्र विधानपरिषदेचे मा. सभापती प्रा. राम शिंदे (Prof. Ram Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर सादरीकरण बैठक पार पडली. आधुनिक सुविधा व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, मजबूत सुरक्षा व्यवस्था व आपत्कालीन व्यवस्थापन प्रणाली, प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ तसेच भविष्यातील गरजांचा विचार करता नवीन विधिमंडळ वास्तूची उभारणी ही काळाची गरज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार नागपूर विधिमंडळ वास्तुच्या विस्तारांतर्गत इमारतीचे बांधकाम व जमिनीचे अधिग्रहण या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी सविस्तर सादरीकरण केले.
अवश्य वाचा: टॅक्सच्या नावाखाली मुंबईकरांची लूट सुरू होणार? भाजपच्या त्या पत्रावरून आदित्य ठाकरेंचा संताप!
शाश्वत व पर्यावरणपूरक विकासास प्राधान्य
या सादरीकरणामध्ये वारसा जपणारे बांधकाम, ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन व पुनर्संचय, दूरदृष्टीशी सुसंगत नियोजन, उपयोगिता व गुणवत्तेचा संतुलित समन्वय, शाश्वत व पर्यावरणपूरक विकास, वृक्ष पुनर्लागवड व स्थलांतर, तसेच पर्यावरण संवर्धनास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

हे देखील वाचा: अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल त्या दोघांनी बोलायला हवं होत, रोहित पवारांनी थेट नावच घेतलं
सर्वसमावेशक, अत्याधुनिक आराखडा तयार (Nagpur Legislative Assembly Building)
यापूर्वीही या प्रकल्पासंदर्भात वेळोवेळी विविध स्तरांवर बैठका संपन्न झाल्या असून, हा प्रकल्प निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यात यावा, यासाठी सविस्तर आराखडा आणि सुक्ष्म नियोजन करण्यात यावे. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील आधुनिक विधिमंडळ वास्तूंचा अभ्यास करून सर्वसमावेशक, अत्याधुनिक व तंत्रज्ञानसंपन्न आराखडा संबंधित विभागांशी समन्वय साधून तयार करण्याचे निर्देश मा. सभापती प्रा. राम शिंदे यांनी यावेळी दिले.
या बैठकीस महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयाचे सचिव-3 डॉ.विलास आठवले, सचिव-4 श्री. शिवदर्शन साठ्ये, उपसचिव वि. शं. कोमटवार, अधीक्षक अभियंता नागपूर श्री. नरेश बोरकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार उपस्थित होते.



