
Nagwade Cooperative Sugar Factory : श्रीगोंदा : सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याला (Nagwade Cooperative Sugar Factory) राष्ट्रीय हरित लवादाने (National Green Tribunal) मोठा दणका दिला आहे. घोड नदीचे प्रदूषण आणि पर्यावरणाच्या नुकसानीप्रकरणी कारखान्याला एकूण २ कोटी ३२ लाख रुपयांचा दंड (Penalty) आणि सुधारणात्मक खर्चाचा आदेश देण्यात आला आहे. एका जागरूक शेतकऱ्याने दिलेल्या कायदेशीर लढ्याला हे मोठे यश मानले जात आहे. नागवडे कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पातून प्रक्रिया न केलेले दूषित पाणी नैसर्गिक नाल्यांमध्ये आणि पर्यायाने घोड नदीत (Ghod river) सोडले जात होते.
नक्की वाचा : श्रीगोंद्यात २५० एकल महिलांचा स्वावलंबनाचा निर्धार

नैसर्गिक ओढ्याचे प्रचंड नुकसान
यात सर्वात गंभीर घटना १० फेब्रुवारी २०२२ रोजी घडली, जेव्हा कारखान्यातील मळीच्या टाकीचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे सुमारे १० ते १२ हजार मेट्रिक टन मळी परिसरात पसरली. ही मळी १ किलोमीटरपर्यंत वाहून गेल्याने शेतजमिनीचे आणि नैसर्गिक ओढ्याचे प्रचंड नुकसान झाले. या आम्लयुक्त मळीमुळे परिसरातील झाडे जळून खाक झाली. काष्टी येथील रहिवासी सचिन सुदामराव पाचपुते यांनी कारखान्याविरुद्ध हरित लवादाकडे दाद मागितली होती. न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंह आणि तज्ज्ञ सदस्य डॉ. सुजित कुमार बाजपेयी यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.
अवश्य वाचा : राहाता शहराजवळील जैन मंदिरातील मोठा दरोड्याचा प्रयत्न फसला
उद्योगांना हा एक कडक इशारा (Nagwade Cooperative Sugar Factory)
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अहवालात कारखान्याचा हलगर्जीपणा स्पष्टपणे समोर आला. जुन्या झालेल्या टाक्यांची दुरुस्ती न केल्यानेच हा अपघात घडल्याचे सिद्ध झाले. या प्रकरणी कारखान्याला २ कोटी ३२ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला पैकी १ कोटी ६ लाख ७ हजार ९० रुपये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जमा करायचे आहेत तर प्रतिबंधात्मक उपायासाठी ७५ लाख रुपये आणि सुधारणात्मक कामासाठी ५१ लाख रुपये द्यायचे आहेत. हा निकाल प्रदूषणाविरुद्ध लढणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांसाठी एक मोठी प्रेरणा ठरला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पर्यावरणाचे रक्षण न करणाऱ्या उद्योगांना हा एक कडक इशारा मानला जात आहे.


