Narhari Zirwal : नगर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी (Election) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) जोरदार तयारी केली आहे. ही निवडणूक महायुतीत लढायची की स्वबळावर याबाबत अद्याप निर्णय झाला नसला तरी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली आहे. महायुती झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मान जनक जागा मिळाव्यात अशीच अपेक्षा आमची आहे. ज्या ठिकाणी आमची ताकद आहे, त्या ठिकाणी आम्हाला जागा मिळावी, अशी मागणी केली आहे. मुस्लिम नागरिक भाजपला मतदान करत नाही म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला जागा दिली जाते, असे चालणार नाही. तर सन्मान जनक जागा मिळाव्यात. अद्याप महायुतीचा निर्णय झाला नसल्याने कार्यकर्त्यांनी संयम ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निष्ठा ठेवून काम करावे, असे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी केले आहे.
नक्की वाचा : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा मानस : पालकमंत्री विखे
इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (ता. १०) नगरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट)च्या तालुका निहाय मुलाखतींसाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, आमदार काशिनाथ दाते, जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत, माजी आमदार चंद्रशेखर घुले, ज्येष्ठ नेते अरुण तनपुरे, प्रदेश सचिव गुंड, पणन महासंघाचे अध्यक्ष दत्ता पानसरे, जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, महिला जिल्हाध्यक्ष अशा निंबाळकर, ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार, तर जिल्हा कार्यालय मंत्री साईनाथ भगत, जिल्हा सचिव सचिन डेरे आदिसह सर्व तालुकाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवश्य वाचा : मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी; दोन संशयित ताब्यात
मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले, (Narhari Zirwal)
पक्षाला जे सोडून गेले ते पुन्हा निवडून येत नसतात. स्वार्थापोटी जे बाहेर गेले त्यांची फजिती झालेली आपण पाहिली आहे. म्हणून उमेदवारी कोणालाही मिळो कार्यकर्त्यांनी निष्ठा ठेवूनच पक्षाचे काम करावे, असे ही त्यांनी म्हटले आहे.
आमदार संग्राम जगताप म्हणाले, (Narhari Zirwal)
राज्यामध्ये असलेले अस्थिरतेचे वातावरण महायुतीची सत्ता आल्याने दूर झाले आहे. महायुतीच्या माध्यमातून राज्यात चांगले काम होत आहे. आता येणाऱ्या सर्व निवडणुकांना ताकदीने सामोरे जायचे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्ण आढावा घेऊन स्थानिक पातळीवर चर्चा केली आहे. नगर शहर व दक्षिण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी चांगले वातावरण आहे. त्यामुळे महापालिका, नगरपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांसाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे. पक्षाच्या वरिष्ठांनी स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद पाहून निर्णय घ्यावा. तिकीट देताना जास्तीत जास्त पक्षाच्या उमेदवारांचा विचार व्हावा, असे त्यांनी म्हटले आहे.
जिल्हाध्यक्ष अशोक सावंत म्हणाले,
अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण भागातील तालुक्यानिहाय नगरपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुकांच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत. या निवडणुकांसाठी पक्षातून मोठ्या संख्यने पदाधिकारी इच्छुक आहेत. या मुलाखतींचा अहवाल तयार करून तो वरिष्ठांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. या निवडणुकांसाठी पक्षाने १३ प्रमुख जणांची कृती समिती केली असून या कृती समितीचे नेतृत्व आमदार संग्राम जगताप करणार आहे. त्याचबरोबर आमदार काशिनाथ दाते, आमदार शिवाजीराव गर्जे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी या समितीत आहेत.



