New Year : अकोले : नववर्षाच्या (New Year) स्वागताचा आनंद द्विगुणित करता यावा म्हणून भंडारदरा धरणाच्या (Bhandardara Dam) पाणलोटातील रिंगरोडवरील आदिवासी पाड्यांच्या परिसरात तुडूंब भरलेल्या जलाशयाच्या भोवती पर्यटकांच्या (Tourists) निवासासाठी जवळपास सुमारे एक हजार कापडी तंबू सज्ज झाले आहेत. नाताळापासून भंडारदरा-रंधा-घाटघर-रतनगड-साम्रद परिसरात थंडी सोबत निसर्गसौंदर्य पाहण्याचा आनंद पर्यटक लुटत आहेत. तर 2024 या सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी (Thirty First New Year Celebration) भंडारदरा धरण, हरिश्चंद्रगड (Harishchandragad) परिसरात पर्यटकांनी आतापासूनच मोठी गर्दी केली आहे.
नक्की वाचा : नगर तालुक्यातील ताबेमारीच्या प्रश्नावर व्यापारी आक्रमक
धरणाच्या कडेला ऐन थंडीत तंबू हे यंदाचे नवे आकर्षण
नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी आपला मोर्चा पर्यटनस्थळांकडील हॉटेल, तंबूकडे (टेंट) वळवला आहे. खाण्यापिण्याचा बंदोबस्त होतो तसेच हॉटेल खर्चाच्या निम्म्या खर्चात काम होत असल्याने अनेकांनी टेंटवाल्यांकडे (तंबू) जाऊन नववर्षाचे स्वागत करण्याचे नियोजन केले आहे. तर शहरातील तरुण तंबू व हॉटेलवर मनसोक्त आनंद घेण्याचा बेत आखताना दिसत आहे. यंदा डिसेंबरमध्ये धरण तुडूंब भरलेले असल्याने धरणाच्या कडेला ऐन थंडीत तंबू हे यंदाचे खास नवे आकर्षण आहे. भंडारदरा जलाशयाभोवती 45 किलोमीटरचा रिंगरोड असून या परिसरात धरणाच्या काठावर आदिवासी युवकांनी पर्यटकांच्या निवासासाठी कापडी तंबू उभारले आहेत. सर्व रिसॉर्ट, हॉटेल व शासकीय विश्रामगृहे गर्दीने ओसंडल्याने पर्यटकांसाठी स्थानिक युवकांनी वन्यजीव व आदिवासी विभागाच्या मदतीने मिळालेल्या कापडी तंबूंच्या साहाय्याने तात्पुरती निवास व्यवस्था केली आहे.
अवश्य वाचा : लाडकी बहीण योजनेचा सरकारी तिजोरीवर भार;शासकीय खर्चाला कात्री
येथील हजारो तरुणाईला रोजगार उपलब्ध (New Year)
मुरशेत, पांजरे-उडदावणे, घाटघर, साम्रद, रतनवाडी, मुतखेल या भागांतील शेकडो आदिवासी तरुणांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे येथील हजारो तरुणाईला रोजगार उपलब्ध झाला आहे. साधारणपणे प्रतिव्यक्ती 1000 ते 1500 रुपयांपर्यंत एक दिवसाचा खर्च पर्यटकांकडून घेतला जातो. चहा, नाश्ता, दोनवेळचे जेवण, शेकोटी, बोटफेरी अशा सुविधा दिल्या जातात. तुडूंब भरलेल्या जलाशयानजीक हे तंबू लावलेले असून पाण्याच्या निळाईत शेकोटीची धग निवळताना दिसते. साम्रद परिसरात आशिया खंडातील दोन नंबरची सांदण दरी, शिखर स्वामिनी कळसूबाई, रतनगड, हरिश्चंद्रगड, आज्या पर्वत, अलंग-मलंग-कुलंग गड, घनचक्कर, करंडा, खुंटा, कात्राईची खिंड आदी गड, डोंगर असून येथे सलग सुट्यांमुळे पर्यटक व गिर्यारोहकांची मांदियाळी आहे. मुंबई, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर भागातील पर्यटक तुलनेने जास्त आहे.
एक दिवसाच्या कौटुंबिक सहली पण मोठ्या प्रमाणात येथे हजेरी लावताना दिसत आहे. भंडारदरा धरणाच्या स्पिल वे, सांडवा गेटजवळ पाण्याच्या कडेला पर्यटकांना कॅम्पिंगचा आनंद मिळावा म्हणून जवळपास 200 तंबू लावण्यात आले आहेत. येथे सतत वाहतुकीची कोंडी अनुभवास येत असून, पर्यटक व वाहनांच्या गर्दीने हा परिसर फुलला आहे. तर भंडारदरा, हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात पर्यटकांनी आनंद द्विगुणित करताना अभयारण्य परिसरात वावरताना वननियमांचे पालन कारणे आवश्यक आहे. अभयारण्य परिसरात जाण्यास मुतखेल व शेंडी नाक्यावर वाहनांची कडक तपासणी होणार आहे. वनक्षेत्रात दारू पिऊन धिंगाणा घालणार्यांविरोधात कडक कारवाई केली जाणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित यांनी सांगितले.