Newasa नेवासा : संत ज्ञानेश्वर (Saint Dnyaneshwar) माऊलींच्या ७२७ व्या संजीवन समाधी सोहळयाच्या निमित्ताने माऊलींची कर्मभूमी असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासे येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरासमोर सोमवारी (ता.११) सायंकाळी ६.३० वाजता आळंदी येथून आणलेल्या पायी ज्योतीद्वारे दीपोत्सवाचा (Festival Of Lights) शुभारंभ करण्यात आला. या दीपोत्सवाने संत ज्ञानेश्वर माऊली मंदिराचे प्रवेशद्वार दिव्यांनी उजळून निघाले होते. यावेळी माऊली नामाचा जयघोष करत माऊली भक्तांनी एक दीप लावून संजीवन समाधी सोहळ्याच्या (Sanjivan Samdhi Sohala) निमित्ताने माऊलींच्या स्मृतीस अभिवादन केले.
नक्की वाचा : ‘पापलेट’ माश्याला आता जीआय मानांकन मिळणार
सोमवारी आळंदी येथून युवकांनी पायी चालत आणलेल्या ज्योतीचे सडा रांगोळ्या घालून व फटाक्यांची आतषबाजी करत नेवासेकरांनी स्वागत केले. यावेळी माऊली ज्योतीने पैस खांबावर ठेवलेले दीप प्रज्वलित करण्यात येऊन मंदिरातील दिपोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. माऊली भक्तांच्या उपस्थितीत झालेल्या दीपोत्सवाच्या प्रसंगी माऊलींचे मूर्तिमंत रुप असलेल्या “पैस” खांबाचे पूजन संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग व उपस्थित संत महंताच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ॐ आकाराच्या बनविण्यात आलेल्या प्रतिकृतीत दीप लावण्यात आले. त्यानंतर मंदिराच्या बाहेर असलेल्या प्रवेशद्वारावर उपस्थित संत महंतांसह भाविकांच्या हस्ते ७२७ दीप प्रज्वलित करून माऊलींच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले.
अवश्य वाचा : लाचखोर महिला तलाठीसह खासगी मदतनीस ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात
यावेळी झालेल्या दिपोत्सव कार्यक्रम प्रसंगी आळंदी येथील गायनाचार्य बाळासाहेब वाईकर यांच्या सुश्राव्य वाणीतून भक्ती गीत गायनाचा कार्यक्रम झाला.संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थान व समर्पण फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.करणसिंह घुले यांनी उपस्थित भाविकांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.
संत ज्ञानेश्वर माऊलींनी नेवासा येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरीची रचना करून विश्वाला न्हावू घालणाऱ्या शब्दांना येथेच जन्म दिला. तसेच “हे विश्वची माझे घर”असा संदेश याच नगरीतून दिला गेल्याने या क्षेत्राला वारकरी संप्रदायात अधिक महत्व असल्याचे प्रतिपादन मंदिर देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी बोलतांना सांगितले. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरावर दीप प्रज्वलित करून तो लावण्यासाठी करजगाव येथील संत किसनगिरी भक्त मंडळ यांनी सेवा दिली. तर उपस्थित महिला भाविकांनी देखील दीपोत्सवात सहभाग नोंदवला. माऊलींच्या आरतीने दीपोत्सव कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमप्रसंगी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे विश्वस्त ज्ञानेश्वर माऊली शिंदे, रामभाऊ जगताप, कृष्णाभाऊ पिसोटे, भिकाजी जंगले, कैलास जाधव समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.करण घुले, सेवेकरी डॉ.संजय सुकाळकर, देविदास साळुंके,डॉ.अशोक ढगे यांच्यासहअनेकजण उपस्थित होते.