Nilesh Lanke : नगर : मागील सन २०२३ मधील पीक विम्यापोटी (Crop Insurance) पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना १२१ कोटी रूपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे, अशी माहिती खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी दिली. यापूर्वी १६ कोटी ५० लाख रूपयांचा सोयाबीन पिकासाठीचा विमा जमा झाला असून आता उर्वरित पिकांसाठी १०५ कोटी रूपये, असा एकूण १२१ कोटी रूपयांचा विमा शेतकऱ्यांच्या (Farmer) खात्यावर जमा होणार आहे.
नक्की वाचा: महाराष्ट्राला स्वाभिमानाची परंपरा – संजय राऊत
लंके यांचा शासनाकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा
कोणत्या पिकासाठी किती विमा याची मंडलनिहाय आकडेवारी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. तालुक्यातील हवामान तसेच नैसिर्गीक स्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ व्हावा, यासाठी खासदार निलेश लंके यांनी शासनाकडे पत्रव्यवहार तसेच पाठपुरावा केला होता. शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनेचा लाभ मिळावा, यासाठी खासदार लंके हे नेहमीच प्रयत्नशील असतात. त्याचाच एक भाग म्हणून पीक विम्यासोबतच शेतकऱ्यांसाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी खासदार लंके यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही पाठपुरावा केला होता.
अवश्य वाचा: जिओ,एअरटेलला धक्का; टाटा आणि बीएसएनएलमध्ये मोठा करार
उर्वरित १०५ कोटी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर (Nilesh Lanke)
मागील वर्षीच्या खरीप हंगामात मूग, सोयाबीन, बाजरी, तूर, कांदा, उडीद या ७१ हजार २५५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा ५७ हजार १८५ शेतकऱ्यांना विविध १ लाख ४८ हजार ८३४ आवेदनपत्रांद्वारे पीक विमा उतरविला होता. दरम्यान, पीक विमा उतरविल्यानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनची अग्रीम रक्कम म्हणून १६ कोटी ५० लाख रूपये इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली असून उर्वरित १०५ कोटी रूपये इतकी रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. पीक विम्यासंदर्भात काही अडचण असल्यास आपल्या पारनेर शहरातील संपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन खासदार लंके यांनी केले आहे.