Nilesh Lanke : नगर : नगरच्या स्थानिक गुन्हे शाखा (Local Crime Branch) ही गुन्हे रोखण्यासाठी की फक्त खंडणी वसुल करण्यासाठी आहे, असा प्रश्न उपस्थित करून ही शाखा जिल्ह्यात गुंडगिरी पाठीशी घालून खंडणी वसुल करीत असल्याचा आरोप खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र पाठवून स्थानिक गुन्हे शाखेतील गैरकारभाराचे पुरावे पाठविले आहेत. खासदार लंके यांच्या उपोषणादरम्यान प्राप्त झालेल्या तक्रारींच्या प्रतीही त्यांनी पत्रासोबत जोडल्या आहेत.
नक्की वाचा: ‘मोदींना सत्ता आणायला छत्रपती लागतात,पण अरबी समुद्रात स्मारक होत नाही’- मनोज जरांगे
कोणतीही कार्यवाही न झाल्याने उपोषण
खासदार लंके यांनी पत्रात नमुद केले आहे की, स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराबाबत पत्रान्वये अवगत करण्यात येऊनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने सोमवारपासून (ता. २२) आपण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसलेले आहोत. उपोषणादरम्यान पोलीस प्रशासनातील काही अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीसांच्या वर्तणुकीसंदर्भात गंभीर तक्रारी समोर आल्या आल्याचे लंके यांनी पत्रात म्हटले आहे.
अवश्य वाचा: अरेच्चा! शेतकऱ्याने शेळ्यांसाठी शिवला रेनकोट
खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून वसुली (Nilesh Lanke)
गंगापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील सोनार दुकानदारास गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन त्यांना विनाक्रमांकाच्या गाडीमधून जबरदस्तीने उचलून आणण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, दत्तात्रेय गव्हाणे, रवींद्र कर्डिले, संदीप दरंदले व पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी १७० ग्रॅम सोने जबरदस्तीने वसुल केले. शेवगाव येथील सराफाच्या दुकानात बनावट आरोपी आणून सोने विकत घेतल्याचा आरोप करून कर्मचारी भाऊसाहेब काळे, रवींद्र कर्डिले व संतोष लोंढे यांनी दमदाटी व खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून ५० ग्रॅम सोने व ५० हजार रुपये वसुल करण्यात आले, असा आरोप केला आहे.
गंगापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील तिरूपती ज्वेलर्स या दुकानदाराने चोरीची वस्तू घेतल्याचा आरोप करून दत्तात्रेय गव्हाणे याने ९० हजार रुपये बळजबरीने घेतले. नगरमधील प्लॅस्टिक विक्री करणाऱ्या व्यवसायिकाला दरोडयाच्या गुन्ह्यात अटक करायची आहे, असे सांगून रवींद्र कर्डिले, शिवाजी ढाकणे, दिनेश आहेर व इतर पाच ते सहा जणांनी दोरीने बांधून पट्ट्याने मारहाण करण्यात आली. चोरीचे सोने घेत असल्याचा आरोप करून त्यांच्या पत्नीकडून दोन लाख ११ हजार ७१२ रुपयांचे दागिने घेण्यात आले असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.