Nilesh Lanke : नीलेश लंकेंचा आमदारकीचा राजीनामा; ‘तुतारी’वर लाेकसभा लढवणार, विखे विरुद्ध लंके जाेरदार सामना रंगणार

Nilesh Lanke : नीलेश लंकेंचा आमदारकीचा राजीनामा; 'तुतारी'वर लाेकसभा लढणार, विखे विरुद्ध लंके जाेरदार सामना रंगणार

0
Nilesh Lanke


Nilesh Lanke : नगर : अहमदनगर लाेकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढण्यासाठी आज आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी सुपा येथून निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. त्यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला असून शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वात तुतारी या चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घाेषणा केली आहे. त्यामुळे विखे विरुद्ध लंके असा जाेरदार सामना रंगणार आहे.

हे देखील वाचा : वसंत मोरेंची वाटचाल ‘वंचित’च्या दिशेने; प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट

विखेंवर जोरदार हल्लाबोल (Nilesh Lanke)

पारनेरमधील सुपा येथे आमदार लंके यांनी आज कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात त्यांनी तुतारी चिन्हावर लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. तसेच ते आमदारकीचा राजीनामा ईमेलद्वारे विधानसभा अध्यक्षांना दिला असल्याचे लंके यांनी सांगितले. नीलेश लंके यांनी या मेळाव्यातून विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. लंके म्हणाले, ”विखेंनी मला संपविण्याचा घाट घातला होता. माझ्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. तुमच्या पीएने पंधरा टक्क्यांनी पैसे जमा केले आहेत. तुमच्या पीएलाही पीए आहेत, असा आरोपही लंके यांनी केला आहे. तुम्ही एक तरी जिल्ह्यात मेडिकल कॉलेज आणले का? केवळ आपले मेडिकल कॉलेज व आपली यंत्रणा चालविण्याचे काम ते करत आहेत.

Nilesh Lanke

नक्की वाचा: नवनीत राणांना पाडणार; बच्चू कडूंनी केला निर्धार

नीलेश लंके म्हणाले (Nilesh Lanke)

” आज लाेकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. आता काेणी किती पण आपटा दोन लाखाहून अधिक मतांनी आपण निवडून येणार आहे. कारण ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे. शिवसैनिकांशी मतभेद असतील, तर बाजूला ठेवा, काँग्रेसशी मतभेद बाजूला ठेवा, जे दुखावले त्यांची माफी मागा. झालं गेलं सोडून द्या. मात्र, आता निवडणुकीसाठी एकत्र आलं पाहिजे. हे सांगत जिल्ह्यात राष्ट्रवादी व केवळ शिवसेनेची ताकद आहे. तिसरी ताकदच नाही. लोकसभा कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे. तुमच्याकडे पैसे आहे पण आमच्याकडे प्रेमाची माणसे आहे. साठ सत्तर वर्षे राज्य केली. पण जिल्ह्यासाठी काय केलं. एक शासकीय मेडिकल कॉलेज नाही आणता आलं कारण तुमचे दवाखाने बंद पडले असते. लोकांना निवडणुकीत आश्वासने देऊन लाेकांची फसवणूक केली. तुमचं  समाजासाठी शून्य योगदान आहे. तुम्ही जनतेशी संपर्क ठेवत नाही. रावणाचा नाश झाला. तर तुम्ही कोण, जेव्हा अहंकार निर्माण झाला तेव्हा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्याकडे यंत्रणा, मोठे माणसे आहे. मात्र, आमच्याकडे जीवा भावाचे मावळे आहेत. तुम्ही एवढे मोठे आहे, मग तुम्हाला कशाला घाम फुटतो. येणारा काळ सांगेल तुम्ही कोण व मी कोण आहे. राजकारणात आपण काय केलं याची उत्तरे शोधा, असा टाेला लंके यांनी विखे पिता-पुत्रांना लगावला आहे. 

पारनेरकरांना थेट भावनिक आवाहन
लाेकसभा निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचे आहे. ही पारनेरकरांची अस्तित्वाची लढाई आहे. प्रत्येकांनी मी उमेदवार म्हणून बाहेर पडले पाहिजे. गावागावात आपले चिन्ह पाेहचवा. आपल्या तालुक्याची अस्तित्वाची लढाई आहे, असे आवाहन नीलेश लंके यांनी केले आहे. आता प्रत्येकाने निवडणूक हाती घेतली पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायची आहे, असे भावनिक आवाहन नीलेश लंके यांनी केले आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here