Nilesh Lanke : नगर : नगर पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेतील (Local Crime Branch) भ्रष्टाचाराबाबत खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण केले. उपोषणाच्या चौथ्या दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या शिष्टाईमुळे खासदार लंके यांनी उपोषण मागे घेतले. खासदार लंके यांच्या मागण्यांवर राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (DGP Rashmi Shukla) यांनी सकारात्मक भूमिका घेत लंके यांच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमून पंधरा दिवसांत अहवाल देण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे खासदार लंके यांनी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण मागे घेतले.
नक्की वाचा: खासदार लंकेंनी मांडला एलसीबीच्या भ्रष्टाचाराचा अर्थसंकल्प
पोलीस अधीक्षकांसोबत शिष्टमंडळाने तीन वेळा केली होती चर्चा
खासदार लंके यांनी उपोषण सुरू केल्यानंतर नगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याशी शिष्टमंडळाने तीन वेळा चर्चा केली. मात्र, ते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने आंदोलनात तोडगा निघू शकला नव्हता. विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे यांच्याकडूनही ठोस आश्वासन देण्यात येत नसल्याने तिसऱ्या दिवशीपर्यंत या आंदोलनाची कोंडी फुटली नव्हती.
अवश्य वाचा: पुण्यात मुसळधार पाऊस;अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
पोलीस महासंचालक यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा (Nilesh Lanke)
आज (गुरूवारी) सकाळी बाळासाहेब थोरात यांनी उपोषणस्थळी येत खासदार निलेश लंके यांच्याशी चर्चा केली. लंके यांच्याशी चर्चेनंतर थोरात यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे यांच्याशी चर्चा केली. मात्र, लंके हे आपल्या मागण्यांवर ठाम राहून त्यांना कालबद्ध आश्वासन हवे होते. त्यामुळे माजी मंत्री थोरात यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. शुक्ला व थोरात यांच्यात सकारात्मक चर्चा होऊन उपोषण सुटण्याचा मार्ग मोकळा झाला.
बाळासाहेब थोरात व रष्मी थोरात यांच्यात झालेल्या चर्चेनुसार खासदार लंके यांनी केलेल्या मागण्या त्यांनी मान्य केल्या. त्यासंदर्भात विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे यांच्याशी शुक्ला यांची चर्चा झाल्यानंतर झालेल्या चर्चेनुसार लंके यांना कराळे यांनी लेखी आश्वासन दिले. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून कराळे यांचे पत्र लंके यांना देण्यात आल्यानंतर खासदार लंके यांच्यासह त्यांच्यासोबत उपोषणाला बसलेले माजी नगरसेवक योगीराज गाडे, बबलू रोहकले यांना बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते लिंबू पाणी देण्यात येऊन आंदोलन मागे घेण्यात आले.
खासदार लंके यांनी केलेल्या चौकशीच मागणी मान्य करण्यात आली असून त्यासाठी नाशिक ग्रामीणच्या अप्पर पोलीस अधिक्षकांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. हे अधिकारी पंधरा दिवसांत तक्रारींची चौकशी करून अहवाल सादर करतील. ही चौकशी आवश्यकता असेल तर इन कॅमेरा करण्यात येईल. पंधरा दिवसांत अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे.
खासदार लंके दिल्लीकडे रवाना
आंदोलन यशस्वी झाल्यानंतर दिल्लीमध्ये सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी खासदार निलेश लंके हे आज (गुरूवारी) सायंकाळी दिल्लीला रवाना झाले. आंदोलनामुळे थकवा आलेला असतानाही सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी मला दिल्लीला जाणे भाग असल्याचे लंके यांनी सांगितले.