Nilesh Lanke : नगर : माझ्या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर बहुतांश भाग ग्रामीण आहे. निवडणुकीदरम्यान कांद्याची निर्यात बंदी (Onion Export Ban) आणि दुधाची दरवाढ हे प्रश्न माझ्या निदर्शनास आले. हे ज्वलंत प्रश्न असून त्याविरोधात आपण संसदेत (Parliament) आवाज उठवणार असल्याचे खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी नवी दिल्लीत (Delhi) माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
नक्की वाचा : हिंदू धर्मात प्रवेश केलेला शिवराम आर्य पुन्हा मुस्लिम धर्म स्वीकारणार; आर्थिक अडचणीमुळे निर्णय
सहकाऱ्यांसमवेत प्रथमच पोहोचले दिल्लीत
लोकसभा निवडणुकीत यश संपादन केल्यानंतर नीलेश लंके हे सहकाऱ्यांसमवेत प्रथमच बुधवारी नवी दिल्लीत पोहोचले. लंके हे देशाच्या राजधानीमध्ये पोहोचल्यानंतर माध्यमप्रतिनिधींनी त्यांना गाठून त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. लंके यांनी मात्र प्रत्येक प्रश्नाला उत्तरे दिले. लंके यांच्या समवेत राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, प्रमोद मोहिते, डॉ. बाळासाहेब कावरे, नितीन चिकणे, सुभाष शिंदे, रामा तराळ, गौरव भालेकर, सुनील कोकरे आदी उपस्थित होते.
अवश्य वाचा : माळशेज घाटात कोसळली दरड;संगमनेर तालुक्यातील दोघांचा मृत्यू
नीलेश लंके म्हणाले (Nilesh Lanke)
कांदा, दूध दराबरोबरच पिण्याच्या, शेतीच्या पाण्याचे प्रश्न आहेत. औद्योगिकरणाचे प्रश्न आहेत. हे प्रश्न येणाऱ्या कालखंडामध्ये हे प्रश्नही मी सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी दिल्ली नवीन आहे. माझ्यासाठी लोकसभेची निवडणूक अविस्मरणीय झाली. मी एकदम सर्वसामान्य कुटूंबातला असून माझ्या राजकीय प्रवास अतिशय खडतर झालेला आहे. कोणताही राजकीय वारसा नसताना ग्रामपंचायतीचा सदस्य, सरपंच ते खासदार या पदापर्यंत पोहचण्याचा बहुमान मला या मतदारसंघातील मायबाप जनतेने दिला असल्याचे लंके यांनी सांगितले.
माझ्यासाठी भाग्याचा दिवस
नेते मंडळींनी माझ्यावर विश्वास टाकला. मतदारांनी तो विश्वास सार्थकी ठरविला. दिल्लीमध्ये आल्यानंतर एक वेगळं वातावरण पहायला मिळालं. कधी आपण स्वप्नात न पाहिलेली दिल्ली, आज आपल्याला प्रत्यक्षात संसदेत जाण्याचा बहुमान मिळणार आहे. माझ्यासाठी हा भाग्याचा दिवस आहे, असे त्यांनी सांगितले.
आईच्या उदरातून शिकून येत नाही
लोकसभा निवडणुकीदरम्यान मराठी आणि इंग्रजीचा वाद सुरू झाला होता. त्यासाठी काही धडे लावण्याचा निर्णय घेतलाय का या प्रश्नावर बोलताना लंके म्हणाले, धडे लावण्याची काही गरज नाही. कोणताही माणूस त्याच्या आईच्या उदरातून शिकून येत नाही. एकदा पाण्यात पडल्यावर पोहायला शिकतोच ना ? तशीच ही स्थिती आहे. मी दिल्लीत आलो आहे. जरा अंदाज घेतो. संसद कोणत्या बाजूला आहे ? कुठून आत जायचं हेच माहिती नाही. मात्र, आत गेल्यानंतर बरोबर शिकणार आहे. कुठल्या माणसाला कुठली भाषा अभिप्रेत आहे ? तशा भाषेतच मला बोलावे लागणार आहे. मला जो प्रश्न मांडायचा आहे त्याला माझी भाषाच समजली नसेल तर मला त्याच भाषेत बोलावे लागेल नाही. त्यासाठी ती भाषा मला शिकावी लागेल. जशास तसे उत्तर मी देऊ शकतो, अशी कोपरखळीही त्यांनी लगावली.