Nilesh Lanke : नगर : शेतकऱ्यांचा मोबदला हा त्यांचा हक्क आहे, उपकार नाही. विकासाच्या नावाखाली त्यांची जमीन घेतली, पण मोबदला मिळत नसल्यास तो अन्यायच आहे. या प्रकरणात वेळकाढूपणा चालणार नाही. संबंधित विभागांनी समन्वयक साधून लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा. केंद्र व राज्य सरकारकडे (State Government) मी स्वतः वैयक्तिकरित्या पाठपुरावा करणार आहे, असे प्रतिपादन खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी सांगितले.
अवश्य वाचा: सफाई काम करणाऱ्या महिलेची मुलगी झाली क्लास वन अधिकारी
प्रलंबित प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी बैठक
नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनामुळे बाधित झालेल्या पारनेर तालुक्यातील सावरगाव व धोत्रे बुद्रुक येथील शेतकऱ्यांना अद्यापही योग्य मोबदला न मिळाल्याने गेल्या काही वर्षांपासून असंतोष वाढत होता. अखेर या प्रलंबित प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी (ता. ३१) प्रांताधिकारी कार्यालय येथे खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
नक्की वाचा : “पंकजा मुंडेंना गृहमंत्री तर सुषमा अंधारेंकडे महिला आयोगाचं अध्यक्षपद द्या”
नऊ वर्षानंतरही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही (Nilesh Lanke)
सन २०१५ मध्ये नगर-कल्याण महामार्गाचे काम वेगाने पूर्ण व्हावे यासाठी या मार्गालगतच्या शेतजमीनी मोठया प्रमाणावर संपादित करण्यात आल्या होत्या. महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे विविध गावाचा बराचसा भाग प्रभावित झाला. परंतु नऊ वर्षानंतरही सावरगाव व धोत्रे येथील शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही, जी इतर शेतकऱ्यांच्या खात्यावर यापूर्वीच जमा झालेली आहे. शेतकऱ्यांनी वारंवार शासन, महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरवा केला, मात्र प्रक्रियात्मक गुंतागुंत, कागदपत्रे व विभागांतील समन्वयाअभावी मोबदला वितरणाचा प्रश्न अनुत्तरीत राहिला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बैठकीदरम्यान शेतकऱ्यांनीही आपल्या भावना मांडल्या. आम्ही विकासासाठी जमीनी दिल्या. परंतु नऊ वर्षानंतरही मोबदल्यासाठी शासन दरबारी हेलपाटे मारावे लागतात. आता आमचा संयम संपला आहे. प्रशासनाने तातडीने न्याय द्यावा, अशी मागणी शेतक-यांनी केली.



