नगर : कलर्स मराठी नव्या वर्षात नवी उर्जा घेऊन आपल्या प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा धमाकेदार खजिना घेऊन येत आहे. महाराष्ट्राचा लाडके आणि विनोदाचा बादशाह असलेले डॉ.निलेश साबळे आपली विनोदाची जत्रा घेऊन कलर्स मराठीवर (Colours Marathi) येत आहे. या कार्यक्रमात निलेश साबळे यांच्यासोबत भाऊ कदम (Bhau Kadam)आणि ओंकार भोजने (Omkar Bhojne) हे विनोदसम्राट देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
नक्की वाचा : राजस्थानचा सलग तिसरा विजय;मुंबईचा घरच्या मैदानावर नमवले
अभिनेते भरत जाधव व अलका कुबल सेलिब्रिटी पाहुणे (Nilesh Sabale)
“हसताय ना ? हसायलाच पाहिजे” या कार्यक्रमाचे लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा डॉ. निलेश साबळे स्वतः सांभाळणार असून यात भाऊ कदम, ओंकार भोजनेबरोबरच सुपर्णा श्याम,स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण आदि कलाकार त्यांना साथ देणार आहेत. तर या कार्यक्रमात महाराष्ट्राचे कॉमेडी किंग आणि संवेदनशील अभिनेते भरत जाधव आणि चार दशकं सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या अलका कुबल आठल्ये हे दोन महान कलाकार दर भागामधे सेलिब्रिटी पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला दाद देण्यासाठी लाभणार आहेत. त्यामुळे विनोदाचा डबल धमाका होईल.
अवश्य वाचा : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे स्टार प्रचारक जाहीर; अमोल कोल्हेंसह ४० दिग्गजांचा समावेश
कलर्स मराठीवर २० एप्रिलपासून पाहायला मिळणार शो (Nilesh Sabale)
डॉ. निलेश साबळे यांनी आपल्या बहारदार विनोदाने संपूर्ण महाराष्ट्राला हसवले. केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात त्यांनी त्यांचे चाहते निर्माण केले. मराठी मनोरंजन सृष्टीत त्यांचे अनेक दिवाने आहेतच पण बॅालीवूडमध्येही त्यांनी सगळ्या सुपरस्टार्सना आपल्या कॉमेडीने जबरदस्त फॅन केले. भाऊ कदम यांनीही आपल्या मिश्किल चेहऱ्याने आणि निखळ विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे केले. तसेच ओंकार भोजनेही आपल्या खास शैलीमुळे प्रेक्षकांचा लाडका झाला. आता विनोदाचे हे तीन हुकमी एक्के एकत्र येऊन पुन्हा एकदा नव्या जोशात, नव्या जल्लोषात विनोदाची चौफेर आतषबाजी करायला सज्ज झाले आहेत. प्रेक्षकांना खळखळून हसवायला येत असलेला ”हसताय ना ? हसायलाच पाहिजे!’ हा शो कलर्स मराठीवर २० एप्रिलपासून शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता पाहायला मिळणार आहे.