नगर : नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे देशाच्या राजकारणातील एक मोठे नाव आहे. भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणाऱ्या नितीन गडकरी यांची ओळख ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशीही आहे. याच नितीन गडकरींच्या आयुष्यावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट (movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे टिझर पोस्टर सोशल मीडियावर (social media) प्रदर्शित करण्यात आले आहे.
गडकरी या चित्रपटाची कथा पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे. तर अक्षय देशमुख या चित्रपटाचे निर्माते आहेत.तर अनुराग भुसारी व मिहिर फाटे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचे टिझर पोस्टर प्रदर्शित झाल्याने यामध्ये नितीन गडकरींची भूमिका कोण साकारेल ? यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली असून लवकरच याचा खुलासा होणार आहे.
या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अनुराग भुसारी म्हणतात, ‘नितीन गडकरी यांची राजकारणातील कारकीर्द निश्चितच उल्लेखनीय आहे. अभ्यासू, प्रभावी वक्ता, कणखर, निरपेक्ष विचार करणारा नेता, रस्ता सुधारणा प्रवर्तक. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या या विविध बाजू जनतेला माहितच आहेत. मात्र त्यांचे वैयक्तिक आयुष्य व तरुण काळ तितकाच रंजक आहे. अशा या नेत्याचा जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. २७ ॲाक्टोबरला हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.