Pankaja Munde : अखेर पंकजा मुंडेंना दिल्लीचा रस्ता

Pankaja Munde : अखेर पंकजा मुंडेंना दिल्लीचा रस्ता

0
Pankaja Munde


Pankaja Munde : नगर : भाजपच्या ताकदवर ओबीसी (OBC) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना राज्यातील भाजपकडून (BJP) सापत्न वागणूक सुरू होती. काल (बुधवारी) भाजपने लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Elections) उमेदवारांची यादी जाहीर केली. यात खासदार प्रीतम मुंडे यांना डावलून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देत दिल्लीत पाठविण्याचा निर्णय झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या कन्यांना जनमत असूनही संघर्ष करावा लागणार हे आता पुन्हा अधोरेखीत झाले आहे.

हे देखील वाचा : निलेश लंकेंनी चुकीची भूमिका घेऊ नये ;अजित पवारांचा इशारा

मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत आल्यापासून राजकारणाला ग्रहण (Pankaja Munde)


गोपीनाथ मुंडे हे मराठवाड्यातील भाजपचे मोठे नेते होते. सुमारे २२ विधानसभा मतदार संघांत त्यांचा शब्द चालायचा. त्यांच्या हयातीतच त्यांचे पुतणे धनंजय मुंडे हे गोपीनाथरावांपासून दुरावले होते. गोपीनाथरावांनी आपला उत्तराधिकारी म्हणून पंकजा मुंडेंना पुढे आणले होते. पंकजा मुंडेही मोठ्या कुशल नेतृत्त्व करणाऱ्या व सभा गाजविणाऱ्या नेत्या आहेत. गोपीनाथरावांच्या मृत्यूनंतर बीड लोकसभा मतदारसंघात प्रीतम मुंडे तर परळी विधानसभा मतदार संघातून पंकजा मुंडे या निवडणूक लढवत राहिल्या. २०१४मध्ये महायुतीची सत्ता येताच पंकजा मुंडेचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या संभाव्य उमेदवारांत चर्चेत होते आणि तिथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला ग्रहण लागणे सुरू झाल्याची चर्चा आहे. 

Pankaja Munde

नक्की वाचा : भाजपकडून डॉ. सुजय विखे पाटलांना उमेदवारी

भाऊबीजेची ओवाळणी (Pankaja Munde)

गोपीनाथरावांच्या निधनानंतर धनंजय व पंकजा मुंडे या भाऊ-बहिणींत सत्तासंघर्ष रंगला होता. अशा वेळी राज्यातील भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना पंकजा मुंडे यांनी भाऊबीजेला ओवाळल्याचे व रक्षाबंधनला राखी बांधल्याचे फोटो खुप व्हायरल झाले. २०१४मध्ये विधानसभेवर निवडून गेल्यावर त्या राज्यात मंत्री झाल्या मात्र, चिक्की घोटाळ्यात त्यांचे नाव चर्चेत येताच त्यांना पदावरून दूर करण्यात आले. पुढे या घोटाळ्याची चर्चाही बंद झाली मात्र, पंकजांना पुन्हा मंत्रीमंडळात स्थान मिळाले नाही. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडेंनी पराभव केला. भावाने बहिणीचा पराभव केला. मात्र, या विजयात धनंजय मुंडेंना भाजपच्याच नेत्यांनी पडद्या मागून मदत केल्याची चर्चा आहे. 


तकाद हवी पण पद नको
या निवडणुकीत भाजपच्या पराभूत उमेदवारांना भाजपने विधानपरिषदेवर घेतले. मात्र, पंकजा मुंडेंचे नाव विधानपरिषद व राज्यसभा निवडणुकांच्या वेळीही डावलण्यात आले. राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांंनाच पंकजा नको असल्याची सांगितले जाते. धनंजय मुंडे महायुतीत दाखल होताच पंकजा मुंडेंना दिल्लीत पाठविण्याचा निर्णय राज्यातील भाजपने घेतला आहे. कारण, त्यांच्या वडिलांप्रमाणेच त्यांचाही शब्द २२ विधानसभा मतदार संघांत चालतो. त्यामुळे भाजपला त्या मते मिळविण्यासाठी हव्या आहेत. मात्र, पदे देताना त्या नकोश्या असल्याचा आरोप त्यांचे कार्यकर्ते करत आहेत. यातच बीड व जालना पट्ट्यात मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. अशा वेळी पंकजा मुंडेंना तोफेच्या तोंडी देण्याची सोयिस्कर रणनीती भाजपने अवलंबल्याची चर्चा आहे.


समर्थकांची नाराजी
२०१९पासून पंकजा मुंडे यांना भाजपकडून सापत्न वागणूक सुरू असल्याचा आरोप त्यांचे समर्थक जाहीरपणे करत आहेत. त्यांच्या एका कार्यकर्त्याने नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे पत्रकार परिषदेत विष प्राशन करत आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. पंकजा मुंडेंनीही आपली नाराजी पत्रकार परिषदांतून व्यक्त केली. मात्र, यात त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. भाजपने नाराज पंकजांना दिल्लीत पाठविण्याची तयारी केली आहे. राज्यातील भाजप नेतृत्त्वाला नकोश्या असलेल्या पंकजांना दिल्लीचा रस्ता दाखविण्यात आल्याची चर्चा आहे. या निवडणुकीत पंकजांचा पराभव झाल्यास त्यांची कारकिर्दही संपू शकते. बीड जिल्ह्यात वंजारी व मराठा दोन्ही समाज तुल्यबळ आहेत. यात राज्यातील भाजप नेतृत्त्वाने मनोज जरांगेंच्या रुपाने मराठा समाजाची नाराजी ओढावून घेतल्याने त्याचा फटका पंकजा मुंडेंना लोकसभा निवडणुकीत बसू शकतो, असे सांगितले जाते. त्यामुळे ही निवडणूक पंकजा मुंडेंच्या अस्तित्त्वाची निवडणूक आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here