नगर : राज्यातील तगडी लढत असलेल्या बीड (Beed) जिल्ह्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यात थेट लढत होत आहे. त्यातच, आता पंकजा मुंडेंसाठी बीडमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची सभा होत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात या सभेची चांगलीच चर्चा रंगली आहे. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीनेही आपला उमेदवार दिला आहे. मात्र, पंकजा विरुद्ध सोनवणे अशीच रंगतदार लढत असणार आहे.
नक्की वाचा : देशात उष्णतेचा स्फोट! ‘या’ राज्यात आठ दिवस राहणार उष्णतेची लाट
पंकजा मुंडेंच्या विजयावर प्रश्नचिन्ह (Pankaja Munde)
भाजपने बीड लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार प्रीतम मुंडेंचं तिकीट कापलं असून पंकजा मुंडेंना तेथून उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयाचं स्वागत करुन पंकजा यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली. मात्र मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पंकजा यांना निवडून येण्यास अडचणी येऊ शकतात. मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरुन बीड जिल्हा गेल्या ६ महिन्यांपासून राज्यात चर्चेत आहे. त्यातच,अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे बीड जिल्ह्यात सातत्याने बैठकाही होत आहेत. जरांगे यांनी कोणाला पाडायचे त्याला पाडा, असे म्हणत मराठा समाजाला संकेत दिले आहेत. त्यामुळे, यंदाच्या निवडणुकीत मराठा समाज काय भूमिका घेतो, हे पाहावे लागेल.
अवश्य वाचा : पंजाब किंग्जचा दणदणीत विजय;चेन्नईचा ७ विकेट्सने पराभव
१० मे ला मोदींची बीडमध्ये सभा (Pankaja Munde)
पंकजा मुंडेंसाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी बीडमध्ये प्रचारासाठी येत आहे. मोदींच्या बीड मधील प्रचार सभेचा मुहूर्त ठरला असून १० मे रोजी नरेंद्र मोदींची येथे सभा होणार आहे. नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात झंझावाती प्रचार सुरू केला असून पंकजा यांच्यासह हिना गावित व सुजय विखे पाटील यांच्यासाठीही नरेंद्र मोदींची जाहीर सभा होत आहे. त्यानुसार, नंदुरबार व अहमदनगरमध्ये ७ मे रोजी पंतप्रधानांच्या जाहीर सभा होणार आहे.