Pathardi | पाथर्डी : श्री संत भगवानबाबा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून ठेवीदारांना जास्त व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी गोळा करून त्या परत न केल्याच्या आरोपावरून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर बुधवारी (ता. ११) पाथर्डी (Pathardi) पोलीस ठाण्यात तेरा जणांविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
नक्की वाचा : कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसाने केलं मुस्लिम बॉयफ्रेंडशी लग्न
रक्कम परत करण्यात आली नाही
अकोला (ता. पाथर्डी) येथील वैद्यकीय व्यवसायिक अरविंद संतोष नागरे (वय ३४) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जास्त व्याजदराचे आमिष दाखवून त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना संस्थेत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. त्यानुसार नागरे यांनी संस्थेत बचत खाते उघडून मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक केली. मुदत पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या खात्यात ४४ लाख २४ हजार ४४७ रुपये इतकी रक्कम शिल्लक होती. तसेच त्यांच्या आई गंगुबाई संतोष नागरे यांच्या खात्यातही २१ लाख ८९ हजार १६१ रुपये इतकी रक्कम होती. मात्र वारंवार मागणी करूनही ही रक्कम परत करण्यात आली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पैसे परत करण्यासाठी संस्थेकडून नंतर काही धनादेश देण्यात आले होते; मात्र ते सर्व धनादेश बँकेत सादर केल्यानंतर वटले नसल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रे तयार करणे, कटकारस्थान अशा विविध कलमे तसेच एमपीआयडी कायद्याच्या कलमान्वये कारवाईची मागणी करण्यात आली होती.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
यांच्यावर गुन्हा दाखल
पाथर्डी पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर अध्यक्ष मंदाकिनी रंगनाथ वैद्य, उपाध्यक्ष मयुर रंगनाथ वैद्य, संचालक शांतलिंग नागनाथ साखरे,जयशाली मयुर वैद्य, राम लक्ष्मण पोपळघट,दिनेश शिवनाथ वैद्य (तत्कालीन संचालक) (सर्व रा. बालमटाकळी, ता. शेवगाव), किशोर अनिल सुरवसे, नितीन सोपानराव तुपे (रा. पिंपळगाव कासार, ता. पाथर्डी), योगेश तुकाराम गायकवाड, वैशाली योगेश गायकवाड (तत्कालीन संचालक) ( रा. राका कॉलनी, नाशिक), अनिल कचरु तिजोरे, पार्वती महादेव राऊत व व्यवस्थापक अविनाश सुधाकर आंधळे( रा. जिरेवाडी, ता. पाथर्डी ) आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .
तक्रारीनुसार, संस्थेच्या संचालक मंडळाने ठेवीदारांकडून मोठ्या प्रमाणात ठेवी स्वीकारून त्या स्वतःच्या तसेच नातेवाईकांच्या नावावर असलेल्या कंपन्या व व्यवसायांमध्ये वळवल्याचा आरोप आहे. काही संचालकांच्या नातेवाईकांना कोट्यवधी रुपयांची कर्जे देण्यात आली असून अनेक कर्जप्रकरणे विनातारण दिल्याचेही नमूद करण्यात आले आहे. तसेच संस्थेच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.तक्रारीत नमूद केल्यानुसार संस्थेच्या माध्यमातून सुमारे ३० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या व्यवहारांचा संदर्भ समोर आला असून या संपूर्ण प्रकरणाचा आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सखोल तपास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतर पाथर्डी पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास पुजारी हे तपास करीत आहे. फिर्यादी तर्फे न्यायालयात अँड. पंकज खराडे यांनी बाजू मांडली.
हे पहा – वडिलांचं स्वप्न मुलीनं केलं पूर्ण; संगमनेरची लेक झाली कलेक्टर !
ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये अडकले
श्री संत भगवानबाबा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या पाथर्डी शाखेतील ठेवीदारांच्या माहितीनुसार या शाखेत सुमारे नऊ कोटी रुपयांच्या ठेवी अडकून पडल्या असल्याचे समोर आले आहे. अनेक ठेवीदारांनी आपल्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी कष्टाने जमा केलेली रक्कम या संस्थेत ठेवली होती. मात्र सध्या ती रक्कम मिळत नसल्याने ठेवीदारांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. आपल्या आयुष्यभराच्या बचतीचा प्रश्न निर्माण झाल्याने ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मागील आठवड्यात ठेवीदारांनी ठेवी मिळवण्यासाठी आंदोलन केले होते.



