Pathardi Municipal Council : पाथर्डी : पाथर्डी नगरपरिषदेच्या (Pathardi Municipal Council) सार्वत्रिक निवडणुकीसाठी (Elections) (सन २०२५- २६) प्रारूप प्रभाग रचना सोमवारी (ता.१८) जाहीर करण्यात आली. मागील प्रभाग रचनेप्रमाणे यंदाची प्रभाग रचना करण्यात आली आहे. सकाळपासूनच नगरपरिषद कार्यालयात हा आराखडा पाहण्यासाठी इच्छुक उमेदवार आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रारूप नकाशे पाथर्डी नगरपरिषद कार्यालयातील सूचना फलकावर उपलब्ध करून देण्यात आले. या गडबडीत एक प्रकारे नगरपरिषद निवडणुकीच्या बिगुलाला सुरुवात झाल्याची चर्चा शहरात रंगली. २०११ च्या जनगणनेनुसार पाथर्डी शहराची लोकसंख्या २७ हजार २११ इतकी नोंदवली असून, त्याआधारे प्रभागांची विभागणी निश्चित करण्यात आली आहे. यंदा एकूण दहा प्रभाग निश्चित केले असून प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक (Corporators) निवडले जाणार आहेत. त्यामुळे एकूण २० नगरसेवकांची निवड होईल. पूर्वी नगरसेवकांची संख्या १७ होती. यंदा दोन प्रभाग वाढल्याने तीन नगरसेवक अधिक निवडले जाणार आहेत. आता तीन नगरसेवकांची संख्या अधिक होणार आहे.तर नगराध्यक्ष हा सर्व प्रभागातील नागरिकांकडून थेट निवडून दिला जाणार आहे.
नक्की वाचा : माहेरी गेलेल्या पत्नीचा परत येण्यास नकार; पतीची चार मुलांना विहीरीत ढकलून आत्महत्या
लोकसंख्येनुसार प्रभागांचे तपशील पुढील प्रमाणे
(कंसात लोकसंख्या)
प्र.क्र.१ – (२५९१),
प्र.क्र.२ – (२७०९),
प्र.क्र.३ – (२५६८),
प्र.क्र.४ – (२६३२),
प्र.क्र.५ – (२९५९),
प्र.क्र.६ – (२७७९),
प्र.क्र.७ – (२९७६ ) (सर्वाधिक),
प्र.क्र.८ – (२५५९),
प्र.क्र.९ – (२९७५),
प्र.क्र.१० – (२४६३) (किमान).
अवश्य वाचा : लग्नाळू युवकाची फसवणूक; सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन पत्नी पसार
हरकती सादर करण्याची मुदत १८ ते ३१ ऑगस्ट (Pathardi Municipal Council)
२०११ जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या – २७,२११ असून प्रभाग संख्या – १० तर नगरसेवकांची संख्या – २० होणार आहे. यापूर्वी १७ नगरसेवक होते. नगराध्यक्ष सर्व प्रभागातून थेट निवडले जाणार आहे. सर्वाधिक लोकसंख्या – प्रभाग क्र.७ (२९७६) तर सर्वात कमी लोकसंख्या – प्रभाग क्र.१० (२४६३) मध्ये आहे. प्रभागांच्या भौगोलिक सीमा अधिसूचना नगरपरिषद कार्यालयात सूचना फलकावर आजपासून नागरिकांच्या अवलोकनासाठी उपलब्ध आहे. इच्छुक नागरिकांनी हरकती व सूचना १८ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत नगरपरिषद कार्यालयातील आवक-जावक विभागात सादर कराव्यात. या हरकती व सूचनांवर सुनावणीकरिता नागरिकांना स्वतंत्रपणे कळविले जाणार आहे. मुख्याधिकारी संतोष लांडगे व नगर रचना विभागाचे नरेंद्र तेलोरे यांनी प्रारूप प्रभाग रचना सोमवारी प्रसिद्ध केली. दरम्यान माजी नगरसेवक चांद मणियार यांनी या प्रारूप प्रभाग रचनेवर लेखी स्वरुपात हरकत घेतली आहे. निवडणुकीचा हा प्रारूप आराखडा नागरिकांसमोर आल्यानंतर आता पाथर्डीकरांचे लक्ष पुढील काही महिन्यांत रंगणार्या राजकीय समीकरणांवर लागले आहे. निवडणूकपूर्व तयारी, पक्षांची रणनीती, आणि मतदारांचा कल या सगळ्यामुळे २०२५ ची पाथर्डी नगरपरिषद निवडणूक ऐतिहासिक ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.