
Pathardi Police Station : पाथर्डी : पाथर्डी शहर (Pathardi City) आणि परिसरात मागील काही महिन्यांपासून वाढत असलेल्या घरफोडी व चोरीच्या घटनांच्या तपासाला आता गती मिळाली आहे. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे रंगार गल्ली, पाथर्डी येथील मूळ रहिवासी आणि सध्या अहिल्यानगर येथे वास्तव्यास असलेला सराईत गुन्हेगार बाळू किशोर कुऱ्हे (वय ७०) याला अटक करण्यात यश मिळवले. चौकशीत त्याने पाथर्डी आणि पाथर्डी पोलीस ठाणे हद्दीतल्या १३हून अधिक चोऱ्यांची (Theft) कबुली दिली. त्यानुसार पाथर्डी पोलीस ठाण्यात (Pathardi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : टीईटी सक्ती रद्द करा; शिक्षक संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
चोरीचा माल अहिल्यानगर येथे विकल्याचे कबूल
अटक आरोपी बाळू कुऱ्हे याने पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांची कबुली दिल्यानंतर त्याला तपासकामी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. त्याच्या रिमांड कालावधीत गुनह्यातील मुद्देमालाबाबत सखोल चौकशी करण्यात आली. आरोपीने चोरीचा माल अहिल्यानगर येथे विकल्याचे कबूल केले.
अवश्य वाचा : गावठी कट्टा बाळगणारे दोघे जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई
४७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
यानंतर पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, दीपक साळवे, आसाराम बटुळे, अंजू सानप यांनी दोन पंचांसह व अटक आरोपीला घेऊन तपासकामी अहिल्यानगर येथे धाड टाकली. तेथे आरोपीने चोरीचा माल ज्या व्यक्तींना विकला होता, त्यांच्या घरी तपास पथक पोहोचले. चौकशीत त्या सर्वांनी आरोपीकडून चोरीचा माल खरेदी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण ४७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
चोरीचा मुद्देमाल खरेदी करणारे इसम पुढीलप्रमाणे : गालीब इस्माईल तांबोळी (वय ४५, रा. शनी मंदिराजवळ, शनी गल्ली, अहिल्यानगर), तिळक राम तमंग (वय २८, रा. चितळे रोड, दरगाहजवळ), निलेश शाम घोगरे (वय २९, रा. संजयनगर, काटवण खंडोबा, अहिल्यानगर), कुमार शेखर कुरापट्टी (वय २८, रा. विठ्ठल मंदिर शेजारी, तोफखाना, अहिल्यानगर), अनिता गोपाल दासरी (वय ५३, रा. महाले मंगल कार्यालयासमोर, गौरी घुमट, अहिल्यानगर) हे सर्व चोरीचा माल खरेदी करणारे अहिल्यानगरचे असून यांच्या ताब्यातून १० गॅस टाक्या (अंदाजे ३० हजार रुपये), ४ इलेक्ट्रॉनिक वजनकाटे (अंदाजे १२ हजार रुपये), १० लोखंडी सत्तुर (अंदाजे ५ हजार रुपये) असा विविध मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.


