Pay & Park Parking : नगरसेवक योगीराज गाडे यांचा पे-अँड-पार्क व नो-हॉकर झोन प्रस्तावास तीव्र विरोध

Pay & Park Parking : नगरसेवक योगीराज गाडे यांचा पे-अँड-पार्क व नो-हॉकर झोन प्रस्तावास तीव्र विरोध

0
Pay & Park Parking : नगरसेवक योगीराज गाडे यांचा पे-अँड-पार्क व नो-हॉकर झोन प्रस्तावास तीव्र विरोध
Pay & Park Parking : नगरसेवक योगीराज गाडे यांचा पे-अँड-पार्क व नो-हॉकर झोन प्रस्तावास तीव्र विरोध

Pay & Park Parking : नगर : अहिल्यानगर महानगरपालिकेकडून (Ahilyanagar Municipal Corporation) शहरातील विविध भागात प्रस्तावित करण्यात आलेल्या पे-अँड-पार्क (Pay & Park Parking), नो-पार्किंग व नो-हॉकर झोन (No-Hawker Zone) निर्णयाविरोधात नगरसेवक योगीराज शशिकांत गाडे (Yogiraj Shashikant Gade) यांनी आज महानगरपालिका आयुक्त यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले.

नक्की वाचा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा टाकणे अयोग्य

शहरातील सर्वसामान्य नागरिक, लहान व्यावसायिक, हातगाडीधारक व फेरीवाले यांच्यावर हा निर्णय अन्यायकारक ठरणार असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. सध्या शहरातील अनेक मुख्य रस्ते खोदकामामुळे अडचणीत आहेत. वाहनसंख्या प्रचंड वाढलेली असताना पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत पे-अँड-पार्कच्या माध्यमातून नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा टाकणे योग्य नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

अवश्य वाचा : उच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर 5 टक्के मुस्लिम आरक्षणाचा शेवट

पर्यायी जागा किंवा रोजगार कोण देणार का? (Pay & Park Parking)

तसेच प्रस्तावित नो-हॉकर झोनमुळे शेकडो कष्टकरी विक्रेत्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. पुनर्वसनाचा ठोस आराखडा नसताना थेट निर्बंध लादणे अमानुष असून त्यांच्या कुटुंबाचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होईल. “या कष्टकरी लोकांना पर्यायी जागा किंवा रोजगार कोण देणार?” असा सवालही नगरसेवक गाडे यांनी उपस्थित केला आहे.

महानगरपालिकेने प्रथम शहरातील पार्किंग क्षमतेचा अभ्यास अहवाल जाहीर करावा, बाधित विक्रेत्यांच्या पुनर्वसनाचा आराखडा स्पष्ट करावा व सर्व लोकप्रतिनिधी, व्यापारी संघटना व फेरीवाला संघटनांसोबत चर्चा करून निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

महसूलवाढीच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांची लूट होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी आवश्यक असल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

अहिल्यानगरच्या सर्वसामान्य नागरिकांच्या व कष्टकरी घटकांच्या हितासाठी हा प्रस्ताव तात्काळ स्थगित करून पुनर्विचार करावा, अशी ठाम भूमिका नगरसेवक योगीराज गाडे यांनी घेतली आहे.