Petrol Pump : नगर : जिल्ह्यातील ४०० पेट्रोल पंपापैकी १५० हून अधिक ठिकाणी डिझेल-पेट्रोलचा पुरवठा (Diesel and Petrol Supply) करणाऱ्या कंपन्यांनी पेट्रोल पंपांना (Petrol Pump) इंधन उपलब्ध करून न दिल्याने त्या ठिकाणी खडखडाट होता. यामुळे दिवसभर नगर शहरासह ग्रामीण भागात नागरिकांची पेट्रोल आणि डिझेलसाठी धावधाव सुरू असल्याचे दिसून आले.
अवश्य वाचा : संगमनेरमध्ये रामजन्मोत्सव भक्तिमय वातावरणात
इंधन टंचाईसदृश परिस्थिती
दरम्यान, पेट्रोल कंपन्यांकडून डिझेल-पेट्रोलचा पुरवठा होत नसल्याने दीडशेहून अधिक पंप बंद झाल्याची माहिती पेट्रोल-डिझेल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी दिली. यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात इंधन टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
आखाती देशात इराण-इस्त्राइल, अमेरिका युद्धामुळे सोशल मीडियावर पेट्रोल-डिझेल संपणार अशी अफवा पसरल्याने जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून वाहन चालकांनी पेट्रोल पंपांवर रांगा लावून गरजेपेक्षा अधिक पेट्रोल, डिझेल भरुन घेतले आहे. यामुळे जिल्ह्यातील चारशेपैकी दीडशेहून अधिक पंपावरील साठा संपल्याने पेट्रोल-डिझेल शिल्लक नाही, असे फलक लावण्याची पंप चालकांवर नामुष्की ओढवली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
कपंनी चालकांकडून पेट्रोल पंप चालकांची अडवणूक (Petrol Pump)
दरम्यान, दुसरीकडे गेल्या दोन दिवसांपासून नगर जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांचे टँकर मनमाड येथे तर दक्षिणेतील पंप चालकांचे टँकर अकोळनेर (ता. नगर) येथील इंधन डेपोवर पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी थांबून आहेत. मात्र, या ठिकाणी इंधन शिल्लक असतांनाही पेट्रोल कंपनीच्या वतीने पेट्रोल पंपांना इंधनाचा पुरवठा थांबवण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच पेट्रोल पंपचालकांनी इंधन कंपन्यांना आगावू इंधनाचे पैसे अदा केल्याने कपंनी चालकांकडून कोणतेही ठोस कारण न देता पेट्रोल चालकांची अडवणूक करण्यात येवून पेट्रोल आणि डिझेल भरून दिले जात नसल्याने जिल्ह्यात इंधन टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.



