Plastic Free : कर्जत: प्लास्टिकच्या अतिरिक्त वापरामुळे पर्यावरणाची (Environment) हानी होत आहे. प्लास्टिकचा वापर कमीत-कमी (Plastic Free) करून शाळा परिसरात यासह घरी देखील विद्यार्थ्यांनी वापर न करण्याची शपथ आणि यंदाच्या नवीन वर्षाचा (New Year) संकल्प न्यू गुरुकुल इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी केला. आफ्रिन सय्यद आणि किरण नाईक यांच्या संकल्पनेतून ही मोहीम अमलात आली.
विद्यार्थी शाळेत प्लस्टिक पिशवीत कोणतीच वस्तू आणत नाही
दैनंदिन उपयोगात प्लास्टिकचा अतिरिक्त वापर मानवी यासह सजीव जीवनात पहावयास मिळत आहे. या प्लास्टिकच्या वापराने पर्यावरणाचा असमतोल अधिक प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास येत आहे. प्लॅस्टिकच्या भस्मासुराने सर्व जगाला विळखा घातला आहे. त्यामुळे सजीवसृष्टी वाचविण्यासाठी प्लास्टिक बंदी काळाची गरज आहे. एकदा वापरून फेकण्यात येणारी प्लास्टिकची उत्पादने, वापर, वितरण, विक्री आणि साठवणूक यावर प्लास्टिक बंदी अधिनियम २०१८ नुसार बंदी घालण्यात आली आहे. याच अनुषंगाने कर्जत शहरातील न्यू गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती करीत मागील दोन वर्षांपासून ही मोहीम अंतर्गत शाळा तसेच शालेय परिसरात एकही विद्यार्थी प्लस्टिक पिशवीत कोणतीच वस्तू आणत नाही. किंवा त्याचा वापर कसा कमी करता येईल याबाबत समुपदेशन करताना दिसत होते.
प्लास्टिकची योग्य विल्हेवाट लावण्याची शपथ (Plastic Free)
याच पार्श्वभूमीवर १ जानेवारी २०२५ या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी या विद्यार्थ्यांनी शाळा, शालेय परिसरानंतर आता घरात देखील या प्लास्टिकचा वापर कसा आटोक्यात येईल याबाबत चंग बांधत नवीन वर्षाचा संकल्प केला आहे. जर काही महत्त्वाच्या कामास प्लास्टिकचा वापर करण्याची नामुष्की आली तर तो कचरा इतरत्र न टाकता तो एका मोकळ्या प्लास्टिक बाटलीत भरून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची शपथ या विद्यार्थ्यांनी घेतली. या उपक्रमाचे संस्थेचे मार्गदर्शक तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर संभाजी लांगोरे, मुख्याध्यापक शिवाजी पाटील, पर्यवेक्षक राजेंद्रकुमार काळे यांनी स्वागत केले.