Police : नगर : नगर शहरातील (Nagar City) पोलिसांत देवदूत पहायला मिळाला. नालेगाव अमरधाममध्ये आढलेल्या मृत नवजात अर्भकाचे (new born infant) नातेवाईक शोधून पोलिसांनी (Police) त्या बालकाचा विधीवत अंत्यविधी केला आहे. हा सर्व घटनाक्रम अवघ्या सहा तासांत घडला. या घटनेची सध्या राज्यभर चर्चा होत आहे. चला तर मग जाणून घेऊ नक्की काय घडले.
नक्की वाचा: श्रीरामपूर खून प्रकरणात दोन आरोपी १२ तासांत गजाआड
गुन्हे शोध पथकाकडून तत्काळ शोध
कोतवाली पोलीस ठाण्यात काल (शुक्रवारी) रात्री ११ वाजता नालेगावच्या अमरधाममधील वॉचमन आला. त्याने कोतवाली पोलीस ठाण्यातून पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना सांगितले की, नालेगाव अमरधाममधील एका खोलीत त्याला नवजात मृत अर्भक कोणीतरी ठेवून गेल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक दराडे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड, सहायक फौजदार गिरीशकुमार केदार यांनी अमरधाम येथे भेट देऊन पाहणी केली. पोलीस निरीक्षक दराडे यांनी तत्काळ गुन्हे शोध पथकाला मृत नवजात बालकाचे नातेवाईक शोधण्यासाठी रवाना केले. दोन तासांतच या पथकाने जिल्हा रुग्णालयातून मृत अर्भकाचे नातेवाईक शोधले.
अवश्य वाचा: मॉडर्नच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली निवडणूक प्रक्रिया
पोलीस निरीक्षक दराडे यांनी आरोपीस घेतले ताब्यात (Police)
पोलीस निरीक्षक दराडे यांनी मृत अर्भकाचे वडील व नातेवाईकांकडे विचारपूस केली. तेव्हा त्यांनी सांगितले की, हे अर्भक जिल्हा रुग्णालयात जन्म घेण्यापूर्वीच मृत पावले. त्यामुळे त्याला दफन करण्यासाठी त्याचे नातेवाईक नालेगावमधील अमरधाम येथे घेऊन गेले. तेथे त्यांना अनोळखी व्यक्ती भेटला. त्याने अर्भकाच्या नातेवाईकांना सांगितले की, मीच या ठिकाणी दफन विधी करत असतो. अर्भकाची आई जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत असल्याने अर्भकाच्या नातेवाईकांनी त्या मृत अर्भकाला अनोळखी व्यक्तीच्या हाती देत त्याचा दफन विधी करायला सांगितले होते. पोलीस निरीक्षक दराडे यांनी प्रसंगावधान राखत मृत अर्भकाच्या आई, वडील व नातेवाईकांवर गुन्हा दाखल न करता त्या अनोळखी व्यक्तीचा शोध घेण्यास पथकाला सांगितले. अर्भकाचा अंत्यविधी करेल असे सांगणाऱ्या अर्जुन मुथ्थू स्वामी या व्यक्तीला पथकाने ताब्यात घेतले.
मृत अर्भकाच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अतिशय हलाखीची असल्याने पोलीस निरीक्षक दराडे, परिविक्षाधीन सहायक पोलीस निरीक्षक कृष्णकुमार सेदवाड व सहायक फौजदार गिरीशकुमार केदार यांनी अर्भकाच्या नातेवाईकांना बरोबर घेत मृत अर्भकाचा विधीवत अंत्यविधी केला.