Police : राहुरी : राहुरी (Rahuri) शहरातील स्टेशन रस्ता परिसरात आज (ता. ११) नगरपरिषद प्रशासनातर्फे पुन्हा अतिक्रमण विरोधात मोहीम राबविण्यात आली. अनेक पक्की बांधकामे असलेल्या दुकानांवर जेसीबी चालविला गेला. अनेकांच्या भावना अनावर झालेल्या होत्या. आपल्या डोळ्यासमोर आपल्या रोजीरोटीचे साधन हिरावले जात होते. या वेळी हे छोटे दुकानदार अस्वस्थ होते. मात्र पोलीस बंदोबस्त असल्याने ते विरोधही करू शकले नाहीत. यावेळी पोलिसांना (Police) मोठा फौजफाटा बरोबर घेऊन अतिक्रमणात असलेले गाळे जमीनदोस्त करण्यात आले. तसेच कारवाईत अडथळा निर्माण करणाऱ्या एका व्यापाऱ्याला ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली.
नक्की वाचा : महिला ग्रामसभेत दारू दुकान गावाबाहेर घेऊन जाण्याचा निर्णय
छोट्या मोठ्या टपऱ्यांसह पक्के गाळे पाडून जमिनदोस्त
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यभर अतिक्रमण विरोधात मोहीम राबविण्यात येत आहे. राहुरी नगरपरिषदच्या वतीने शहरात गेल्या महिनाभरा पासून कारवाई सुरु आहे. राहुरी नगरपरिषद प्रशासनाकडून गरीब मोठा असा भेदभाव करत असल्याचे आरोप करण्यात आले. मात्र, आज सकाळी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी आक्रमक भूमिका घेऊन शहरातील शनीचौक ते पाच नंबर नाका पर्यंत स्टेशन रस्ता परिसरातील अतिक्रमणात असलेले छोट्या मोठ्या टपऱ्यांसह पक्के गाळे जेसीबीच्या सहाय्याने पाडून जमिनदोस्त करण्यात आले. यावेळी नगरपरिषद व पोलिसांचा मोठा फौजफाटा उपस्थित होता. तर हजारो नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

अवश्य वाचा : शिव्या बंदीच्या शासन निर्णयासाठी सरपंच आरगडे यांचे उपोषण
ज्येष्ठ पत्रकाराला घेतले ताब्यात (Police)
दरम्यान, स्टेशन रस्ता परिसरातील ज्येष्ठ पत्रकार तसेच व्यापारी महादेव भागूजी काळे यांनी थाळीनाद आत्मक्लेश आंदोलन करून अतिक्रमणाच्या कारवाईला विरोध केला. मात्र, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी बळाचा वापर करून काळे यांना ताब्यात घेतले. या बाबत दुपारी उशिरा पर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. राहुरी नगरपरिषद प्रशासना ने आज आक्रमक भूमिका घेऊन कारवाई करण्यास सुरवात केली. अनेक छोट्या मोठ्या टपऱ्यांसह पक्के गाळे पाडून जमीनदोस्त केले. आज झालेल्या कारवाईमुळे शहरातील धन दांडगे अतिक्रमणधारक व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.